इंडियन वेल्स टेनिस स्पर्धा : डॉमनिक थिएमला इंडियन वेल्सचे विजेतेपद

अंतिम सामन्यात फेडररचा केला पराभव

इंडियन वेल्स – कारकीर्दीत आतापर्यंत पाच वेळा इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या टेनिसपटू रॉजर फेडररला सोमवारी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का बसला. ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीएमने फेडररला 3-6, 6-3, 7-5 असे पराभूत करत त्याचे विक्रमी सहाव्या जेतेपदाचे स्वप्न धूळीस मिळवतान स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. आतापर्यंतच्या कारकीर्दीत फेडररवर मिळवलेला थीएमचा हा तिसरा विजय ठरला. तर, 1997 नंतर प्रथमच ऑस्ट्रियन टेनिसपटूने मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

जागतिक टेनिस क्रमवारीत आठव्या स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रियाच्या थीएमला यापूर्वीच्या दोन्ही मास्टर्स स्पर्धाच्या अंतिम फेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र, या वेळी त्याने आपली ही कसर भरून काढली. जवळपास दोन तास रंगलेल्या या सामन्यात थीएमने नेटजवळ अप्रतिम खेळ केला.

कारकीर्दीतील 12व्या विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या थीएमने पहिला सेट गमावल्यानंतर झोकात पुनरागमन करत जागतिक टेनिस क्रमवारीत चौथ्या स्थानी असणाऱ्या फेडररवर सरशी साधली. यावेळी सामन्याचा पहिला सेट थिएमने 3-6 अशा फरकाने गमावला. यावेळी फेडररने अचुक सर्व्हिस सोबतच थिएमवर दबाव वाढवताना जाळी जवळुन सुरेख खेळ केल्याने थिएमला पहिल्या सेटमध्ये आपल्या लौकिकास साजेशा खेळ साकारण्यात अडचण आली. त्यामुळे त्याच्यावरील दबाव वाढला आणि त्याने हा सेट 3-6 अशा फरकाने एकतर्फी गमावला.

मात्र, दुसऱ्या सेट मध्ये त्याने आपल्यावरील दबाव दुर करताना जाळेच्या जवळ येत फेडररवर दबाव आणायचा प्रयत्न केला. त्यामुळे फेडररला मैदानाच्या दोन्ही बाजुस पळावे लागत होते. याचा फायदा घेत थिएमने दुसऱ्या सेट मध्ये पहिल्या सर्व्हिस पासूनच फेडररवर दबाव वाढवला. त्यामुळे दुसरा सेट थिएमने 6-3 अशा फरकाने आपल्या नावे करत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली.

तर, अखेरच्या सेट मध्ये दोन्ही खेळाडूंनी आपापला खेळ उंचावताना एकमेकांवर दबाव आणायचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही मोक्‍याच्या क्षणी आपला खेळ उंचावत असल्याने सामन्यातील हा महत्वाचा सेट रोमांचक होत होता. मात्र, अखेरीस थिएमने फेडररचा 7-5 असा पराभव करत या सेट सह अंतिम सामना आपल्या खिशात घातला. सलग दुसऱ्या वर्षी फेडररला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 2018मध्ये डेल पोत्रोने त्याला अंतिम लढतीत पराभूत केले होते. तर, थिएमचेहे 12वे विजेतेपद आहे.

“दडपणाच्या परिस्थितीतही थीएमने संयम बाळगला. त्यामुळेच चेंडूवर नियंत्रण मिळवणे त्याला अधिक सोपे गेले. असाच खेळ केल्यास भविष्यात तो आणखी विजेतेपदे सहज जिंकू शकतो. माझे लक्ष आता आगामी मियामी ओपन स्पर्धा असून त्या स्पर्धेचे च्विजेतेपद पटकावण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे.
-रॉजर फेडरर, स्वित्झर्लंडचा टेनिसपटू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)