रविवारी भारतीय पारंपरिक खेळ दिवस 

जुन्या पारंपरिक खेळाचे पुनरुज्जीवन व्हावे म्हणून उपक्रम 
या कार्यक्रमाचे आयोजन
सातारा- रविवार, दिनांक 12 ऑगस्ट 2018 रोजी छ शाहू स्टेडियम, सातारा येथे भारतीय पारंपरिक खेळ दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या रविवारी अशा प्रकारचा खेळ दिवस साजरा करण्याचा मानस आहे असे संयोजकांतर्फे सातारा रनर्सचे संस्थापक डॉ. संदीप काटे यांनी सांगितले. या उपक्रमाचे संयोजन हे सातारा रनर्स फौंडेशन, सजग पेरेंट्‌स ग्रुप, गुरुकुल स्कूल, जायंट्‌स ग्रुप, सातारा इंग्लिश मेडीयम स्कूल, रोटरी क्‍लब आफ सातारा अजिंक्‍य, विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. हल्लीच्या काळात तंत्रज्ञान व मोबाइलच्या अतिरेकामुळे लहान मुले, तरुण पिढी तसेच वयस्कर सुद्धा पारंपरिक खेळाकडे अजिबात वळत नाही अशी खंत वाटल्यामुळे या जुन्या पारंपरिक खेळाचे पुनरुज्जीवन व्हावे आणि हे खेळ काळाच्या ओघात विलुप्त होऊ नयेत या हेतूने या उपक्रमाचे दरवर्षी नियोजन करण्याचा मानस आहे असे संयोजकांनी सांगितले.

-Ads-

दिनांक 27 मे 2018 रोजी आकाशवाणी वरून प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनीसुद्धा अशा प्रकारचे आवाहन केले होते की देशाच्या विविध भागामध्ये अशा प्रकारचे खेळ खेळले जात होते आणि आता हे खेळ दुर्मिळ होत चालले आहेत. परंतु अनेक राज्य, अनेक भाषा आणि अनेक संस्कृती असूनसुद्धा विविधतेतून एकतेचा संदेश देणारे अशा प्रकारचे हे खेळ आहेत. यामुळे सांघिक भावना, मानसिक शक्ती हे गुण वाढण्यासाठी हे खेळ खेळणे कसं आवश्‍यक आहे याच महत्व त्यांनी विशद केलं आणि अशा प्रकारचे खेळ लुप्त होत चालले आहेत ते जतन होण्यासाठी आपण सर्वानी मिळून प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, असे आवाहन त्यांनी केले होते. या त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणूनदेखील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे. गेल्या वर्षीदेखील अशा प्रकारच्या खेळांचे सातारा येथे आयोजन केले होते.

यावर्षी साताऱ्यातच नव्हे भारतभर हा पारंपरिक खेळ दिवस साजरा करण्यात येणार आहे व इथून पुढे दरवर्षी तो साजरा केला जाईल अशी माहिती संयोजकांनी दिली. सातारा व्यतिरिक्त मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली,अशा अनेक ठिकाणीदेखील अशा प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. एकाच वेळी एकाच दिवशी भारतभर दरवर्षी हा भारतीय पारंपरिक खेळ दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जाईल असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला.

यावर्षी या कार्यक्रमाचे आयोजन छ. शाहू स्टेडियम सातारा येथे सकाळी 9.00 ते दुपारी 12. 00 या वेळेत करण्यात आले आहे. यावेळी गोट्या, भोवरे, विटी दांडू, लगोरी, आबादुबी, लंगडी, ठिकऱ्या, पकडापकडी, विषामृत, इत्यादी जवळसपास वीस प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व खेळ व खेळाचे साहित्य सर्वाना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी पालकांनी आपल्या पाल्याना तसेच जेष्ठ नागरिकांना देखील या कार्यक्रमाला छ.शाहू स्टेडियम येथे अवश्‍य घेऊन यावे व आपल्या बालपणीच्या जुन्या आठवणी पुन्हा जागृत कराव्यात. यावेळेस जगातील सर्वात मोठ्या भोवऱ्यांपैकी एक असलेल्या साधारण 60 किलो वजनाचा लाकडी भोवरा फिरवण्याचं प्रात्यक्षिकदेखील यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी सौ. श्वेता सिंघल व सातारा पोलीस अधीक्षक पंकज देशपुख हे देखील उपस्थित राहणार आहेत.
तरी सातारकर क्रीडाप्रेमीनी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)