भारतीय युवकांची श्रीलंकेवर मात

चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना

मोराटुवा: कर्णधार आर्यन जुयालसह देवदत्त पडिक्‍कल आणि यश राठोड यांची शानदार अर्धशतके आणि आयुष बदोनी व हर्ष त्यागी यांचा भेदक मारा यामुळे भारतीय युवक संघाने चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या युवक संघाचा 135 धावांनी दणदणीत पराभव केला. नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय युवक संघाने निर्धारित 50 षटकांत 6 बाद 278 धावांची मजल मारली. त्यानंतर श्रीलंका युवक संघाचा डाव 37.2 षटकांत 143 धावांवर गुंडाळून भारतीय युवक संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या विजयामुळे भारतीय युवक संघाने पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील पहिला सामना भारतीय युवकांनी जिंकल्यावर श्रीलंकेने पुढचे दोन्ही सामने जिंकून आघाडी घेतली होती. विजयासाठी 279 धावांच्या आव्हानासमोर श्रीलंकेचे बहुतेक प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. नावोद परनवितना आणि कर्णधार निपुण धनंजया यांनी दुसऱ्या गड्यासाठी केलेल्या 60 धावांच्या भागीदारीचा अपवाद वगळता श्रीलंकेच्या युवकांनी सपशेल शरणागती पत्करली. परनवितनाने 59 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकारासह 45 धावा केल्या. तर निपुण धनंजयाने एका चौकारासह 36 धावा करून त्याला साथ दिली. मुदिता लक्षण (18) व रुविन पेईरिस (10) वगळता श्रीलंकेच्या बाकी फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.

भारतीय युवक संघाकडून आयुष बदोनीने 35 धावांत 3, तर हर्ष त्यागीने 37 धावांत 3 बळी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. अथर्व तायडे, सिद्धार्थ देसाई व आकाश पांडे यांनी प्रत्येकी एक गडी बाद करताना त्यांना सुरेख साथ दिली. मालिकेतील अखेरचा व निर्णायक पाचवा एकदिवसीय सामना येत्या शुक्रवारी (10 ऑगस्ट) रंगणार आहे. त्याआधी भारतीय युवक संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. देवदत्त पडिक्‍कलच्या साथीत 33 धावांची सलामी दिल्यावर अथर्व तायडे (20) विजयकुमाराच्या माऱ्यावर तंबूत परतला. मात्र देवदत्त पडिक्‍कलला पवन शाहची साथ लाभली.

देवदत्त व पवन या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 17.2 षटकांत 94 धावांची दमदार भागीदारी करताना भारताचा डाव सावरला. तीन चौकारांसह 36 धावा करणाऱ्या पवन शाहला बाद करीत मेंडिसने ही जोडी फोडली. तसेच लक्षणने पडिक्‍कलला परतवीत श्रीलंकेला महत्त्वाचे यश मिळवून दिले. देवदत्त पडिक्‍कलने 91 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकारासह 71 धावांची खेळी केली. त्यानंतर आर्यन जुयाल व यश राठोड यांची जोडी जमली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 15.4 षटकांत 92 धावांची भागीदारी करीत भारतीय युवक संघाला सुस्थितीत नेले. जुयालने 5 चौकारांसह 60 धावांची खेळी केली. तर राठोडने 5 चौकारांसह 56 धावांची भर घातली. हे दोघे परतल्यावर समीर चौधरीच्या नाबाद 24 धावांमुळे भारतीय युवक संघाला 278 धावांची मजल मारता आली. आविष्का लक्षण व संदुन मेंडिस यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)