रोका यांना जमले नाही ते कुआद्रात करून दाखविणार का

इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धा

मुंबई – हिरो इंडियन सुपर लीगमध्ये गतवर्षी पदार्पणात उपविजेतेपद मिळविलेल्या बेंगळुरू एफसीची कामगिरी कौतुकास्पद ठरली होती. त्यावेळी अल्बर्ट रोका यांना जेतेपद मिळविण्यात अपयश आले. ही कामगिरी या मोसमात कार्लेस कुआद्रात करून दाखविणार का याची उत्सुकता आहे.

रोका यांनी गेल्या मोसमाअखेर बेंगळुरू एफसीबरोबरील प्रशिक्षकपदाचा करार वाढवायचा नाही असा निर्णय घेतला. त्यावेळी या चॅम्पीयन संघाची पसंती स्वाभाविक होती. कुआद्रात यांच्या रुपाने परिचीत चेहऱ्यास ही पसंती होती. याचे कारण स्पेनचे कुआद्रात प्रशिक्षण दलाचा एक भाग होते. भारतीय फुटबॉलमध्ये मापदंड उंचावलेल्या या क्‍लबची कार्यपद्धती त्यांना ठाऊक होती. कुआद्रात यांची निवड योग्य आहे का, रोका यांची जागा ते समर्थपणे चालवू शकतील का, त्यांच्याआधी रोका आणि ऍश्‍ली वेस्टवूड अशा दिग्गज प्रशिक्षकांचा केला तसा त्यांचा आदर खेळाडू करणार का, असे अनेक प्रश्न तेव्हा निर्माण झाले होते. पण याविषयी बेंगळुरू एफसी व्यवस्थापनाला कोणताही प्रश्न पडला नव्हता.

आता बेंगळुरू एफसीची भूमिका योग्य ठरली आहे. गेल्या मोसमात हुकलेले हिरो आयएसएल जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने बेंगळुरू एफसी संघातील एकजुट कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी भक्कम झाली आहे. ही एकजुट आणि लढाऊ वृत्तीच्या जोरावर बेंगळुरू एफसीने यंदाच्या मोसमात सामन्यातील प्रतिकूल परिस्थितीतून अनेक वेळा मार्ग काढला आहे.

यात एफसी गोवाविरुद्ध 45 मिनिटे दहा खेळाडूंनिशी खेळण्याची वेळ येऊनही मिळविलेल्या 3-0 अशा दणदणीत विजयाचा समावेश आहे. उपांत्य फेरीत पहिल्या टप्यात 1-2 असा पराभव होऊनही नॉर्थइस्ट युनायटेड एफसीविरुद्ध याच संघाने पारडे फिरविले. अशी काही उदाहरणे देता येतील. अंतिम फेरीत धडक मारताना बेंगळुरू एफसीने अशी एकजुट प्रदर्शित केली आहे. कुआद्रात यांनी सांगितले की, आता आमच्यासमोर एकच आव्हान उरले आहे आणि ते म्हणजे अंतिम सामना जिंकणे. अंतिम सामना निश्‍चितच खडतर असेल. एफसी गोवा संघ अप्रतिम आहे.

बेंगळुरूच्या आधीच्या संघांच्या तुलनेत या संघात काहीतरी वेगळे आहे. अपेक्षित निकाल साध्य करण्यासाठी कसून खेळ करण्याची क्षमता या संघाने कमावली आहे. गेल्या मोसमात रोका यांच्या मार्गदर्शनाखाली बेंगळुरूने साखळी टप्प्यात वर्चस्व राखत अंतिम फेरीत आरामात प्रवेश केला. या मोसमात काही वेळा त्यांचा संघ कमी पडत असल्याचे दिसत होते. पण अंतिम फेरीतील त्यांच्या प्रवेशाविषयी कधीच शंका नव्हती. गेल्या मोसमात मिकू आणि सुनील छेत्री यांनी बहुतांश स्कोअरींग करीत संघाची धुरा पेलली होती. यंदा कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखाली सांघिक खेळाच्या जोरावर बेंगळुरूची आगेकूच झाली आहे.

यावेळी एकाच विशिष्ट खेळाडूची कामगिरी उठून दिसत नाही. याचे कारण प्रत्येकानेच वाटचालीत योगदान दिले आहे. जे संघाच्या व्यापक हिताचे ठरले आहे. मिकू दुखापतीमुळे काही सामने खेळू शकला नाही, तर छेत्री झगडत होता. यानंतरही निर्णायक विजयाचे गुण संघाला वसूल करून देणारा एकतरी खेळाडू पुढे येत राहिला. हरमनज्योत खाब्रा याचे आक्रमक मध्यरक्षकात रुपांतर करण्यात आले. उदांता सिंगने आक्रमणात मोक्‍याच्या क्षणी आणखी भरीव प्रयत्न केले. एरीक पार्टालू मोसमाच्या अंतिम टप्प्यात जायबंदी झाला असताना डिमास डेल्गाडो याने मध्य फळीची आणखी जबाबदारी पेलण्यासाठी पुढाकार घेतला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)