इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा : यंदा नॉर्थइस्ट युनायटेडची वाटचाल थक्क करणारी

मुंबई – हिरो इंडियन सुपर लीगच्या पाचव्या मोसमामधे नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने प्रथमच बाद फेरीत प्रवेश केला. मात्र, आयएसएलच्या पाचव्या मोसमाचा विजेता ठरलेल्या बेंगळुरू एफसीविरुद्ध त्यांची वाटचाल खंडित झाली, पण प्रशिक्षक एल्को शात्तोरी यांच्यामुळे प्रेरित झालेल्या या संघाची कामगिरी म्हणजे साधी कार जणू काही फेरारीच्या वेगाने जाण्यासारखी ठरली.

शात्तोरी यांनी ट्‌वीट केले आणि सुंदर मोसमात योगदान दिलेल्या प्रत्येकाचे आभार मानले. दुसरीकडे संघाचा मालक अभिनेता जॉन अब्राहम याने दुखापतींचा अडथळा येऊनही खेळाडूंनी सर्वस्व पणास लावून झुंजार खेळ केल्याचा अत्यंत अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली. नॉर्थइस्टकरीता हा मोसम खरोखरच संस्मरणीय ठरला. आधीचे चार प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर यंदा त्यांनी बाद फेरीचा टप्पा गाठला.

उपांत्य फेरीतील पहिल्या टप्यात घरच्या मैदानावर विजय मिळवूनही नॉर्थइस्टचे आव्हान संपुष्टात आले, पण या वाटचालीमधून त्यांच्यासाठी जमेच्या अनेक बाजू दिसल्या. लिगच्या प्रारंभी संघांची घोषणा झाली तेव्हा नॉर्थइस्ट इतकी मजल मारून इतिहास घडवेल असे फार कुणाला वाटले नव्हते. आता मोसमाची भव्य सांगता होत असताना नॉर्थइस्टच्या खात्यात उपांत्य फेरीतील प्रवेश जमा आहे. खरे तर अंतिम फेरीतील त्यांचा प्रवेश थोडक्‍यात हुकला.

काही महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापत झाली नसती तर चित्र कदाचित वेगळे दिसले असते. पहिल्या टप्यातील सामन्यात त्यांना मध्यंतरानंतर बार्थोलोम्यू ओगबेचे याला मुकावे लागले. दुसऱ्या सत्रात रॉलीन बोर्जेस जायबंदी झाला. मग बेंगळुरूमधील सामन्यात फेडेरिको गॅलेगो याच्या दुखापतीमुळे आणखी एक धक्का बसला. या तीन प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत नॉर्थइस्टचे आव्हान संपणे अटळ होते.

उपांत्य फेरीचा अंतिम निकाल नॉर्थइस्टकरीता वेदनादायक ठरेल, पण दोन्ही टप्यांत बेंगळुरूला कडवा संघर्ष करावा लागला. शात्तोरी यांचे डावपेच दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे तडीस जाऊ शकले नाहीत. शात्तोरी यांनी सांगितले की, आमचा मोसम संस्मरणीय ठरला. आम्ही केवळ चार वेळा हरलो याचा अर्थ आम्ही काहीतरी नक्कीच अचूक केले आहे.

अनेक सामन्यांत आम्ही सर्वाधिक भक्कम अशा 11 खेळाडूंचा संघ उतरविला बेंगळुरूमध्ये मात्र आम्हाला बोर्जेस आणि ओगबेचे यांच्याशिवाय खेळावे लागले. शेवटी संघात संतुलन महत्त्वाचे असते. संघनिवडीच्यावेळी मात्र शात्तोरी यांना विपूल पर्याय कधीच मिळाले नाहीत. बहुतेक वेळा एक खेळाडू जायबंदी किंवा निलंबित होता, पण धुर्त डावपेच आणि खेळाडूंच्या क्षमतेचे योग्य व्यवस्थापन या बलस्थानांमुळे त्रुटींवर मात करता आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)