इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात

गोवा: हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आएसएल) बेंगळुरू एफसीपाठोपाठ बाद फेरीतील प्रवेश नक्की करण्याचा एफसी गोवा संघाचा प्रयत्न राहील. सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघ फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर केरळा ब्लास्टर्स एफसीविरुद्ध खेळेल.

गोवा सध्या 15 सामन्यातून 28 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही लढत जिंकल्यास त्यांचे बाद फेरीतील स्थान नक्की होईल. गोवा संघ सध्या अप्रतिम फॉर्मात आहे. पाच सामन्यांत त्यांनी अपराजित मालिका राखली आहे. मागील सामन्यात त्यांनी बलाढ्य एटीकेवर 3-0 असा दणदणीत विजय मिळविला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या लढतीत गोव्याने एटीकेला काहीही दयामाया दाखविली नाही. यात फेरॅन कोरोमनास या स्टार स्ट्रायकरने दोन गोलांसह सिंहाचा वाटा उचलला. याबरोबरच त्याने गोल्डन बुटच्या शर्यतीत नॉर्थइस्ट युनायटेडचा स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे याला मागे टाकले. कोरोमीनासने 13 गोल नोंदविले आहेत. गोव्याचे अखेरचे दोन सामने गतवर्षी अंतिम फेरीत झुंजलेल्या बेंगळुरू एफसी आणि चेन्नईयीन एफसी यांच्याविरुद्ध आहेत. अशावेळी ब्लास्टर्सविरुद्ध कमाल गुण वसूल करण्याचा गोव्याचा प्रयत्न राहील.

लॉबेरा यांनी सांगितले की, नव्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चित्र पालटलेल्या एका चांगल्या संघाविरुद्ध आम्हाला सामोरे जायचे आहे. शंभर टक्के प्रयत्न केले नाहीत आणि सगळ्या गोष्टी बरोबर केल्या नाहीत तर तीन गुण मिळणार नाहीत याची मला खात्री आहे. आम्ही जिंकलो तर बाद फेरीतील स्थान नक्की करू आणि मग गुणतक्त्‌यात अव्वल स्थान पटकावण्याचा प्रयत्न करू. दुसरीकडे ब्लास्टर्सकरीता केवळ थोडीफार प्रतिष्ठा कमावण्यापुरते खेळण्याची वेळ आली आहे. पहिल्या सहा संघांमध्येही नेलो विंगाडा यांच्या संघाला स्थान मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

डेव्हिड जेम्स यांच्याकडून सुत्रे स्विकारल्यापासून विंगाडा यांचा मार्ग सोपा राहिलेला नाही. पहिल्या तीन सामन्यांत त्यांना दोनच गुण मिळू शकले. दिल्ली डायनॅमोजकडून 0-2 असा पराभव झाल्यापासून त्यांनी पारडे थोडेफार फिरविले आहे. बेंगळुरूविरुद्ध त्यांनी अप्रतिम खेळाच्या जोरावर दोन गोलांची आघाडी अखेर दवडली आणि त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले.

मागील लढतीत मात्र ब्लास्टर्सने गतविजेत्या चेन्नईयीनला 3-0 असे हरविले. त्यामुळे विंगाडा यांना प्रशिक्षक या नात्याने पहिला विजय मिळाला. विंगाडा यांनी सांगितले की, आयएसएलमधील सर्वोत्तम प्रतिस्पर्ध्याला आमचा संघ कसा सामोरा जातो हे सुद्धा मला या सामन्यातून पाहायचे आहे. गोवाच्या संघ आमच्यापेक्षा सरस आहे यात शंकाच नाही, तसेच गुणांमधील फरक सुद्धा हे दाखवितो, पण म्हणून गोवा सामना जिंकेल असे नाही. मोसमाच्या प्रारंभी कोचीत पहिल्या टप्यातील सामन्यात गोव्याने 3-1 असा विजय मिळविला होता. आता गोवा दुहेरी विजय मिळविणार का की विंगाडा यांचा ब्लास्टर्स संघ पराभवाची परतफेड करणार याची उत्सुकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)