#प्रासंगिक: भारतीय अवकाश वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई

प्रसाद कुलकर्णी

भारतीय अंतराळ संशोधनाचे पितामह थोर शास्त्रज्ञ डॉ. विक्रम अंबालाल साराभाई यांचे जन्मशताब्दी वर्ष आज रविवार दि. 12 ऑगस्ट 2018 पासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने या महान शास्त्रज्ञाविषयी…

भारतीय अंतराळ संशोधनाचे पितामह म्हणून ज्यांना संबोधले जाते ते थोर शास्त्रज्ञ म्हणजे डॉ. विक्रम अंबालाल साराभाई. 12 ऑगस्ट 1919 रोजी अहमदाबादमध्ये जन्मलेल्या डॉ. साराभाईंचे जन्मशताब्दी वर्ष आता सुरू होत आहे. त्यांचे वडील उद्योगपती होते. तसेच एका संपन्न कुटुंबाचा त्यांना वारसा होता. रविंद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सरोजिनी नायडू आदी दिग्गज मंडळींचे त्यांच्या घरी येणे जाणे होते. त्यांच्या मातोश्री सरलाबाई यांनी एक शाळा चालविली होती. विक्रमभाई तिथेच प्राथमिक-माध्यमिक शाळा शिकले. उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. केंब्रिज विद्यापीठात त्यांनी गणित व विज्ञानाची पदवी मिळविली. 1945 साली त्यांनी “उष्णकटिबंधातील वैश्‍विक किरण’ या विषयावर पी.एचडी. प्राप्त केली. नोबेल विजेते डॉ. सर सी. व्ही. रामन त्यांचे मार्गदर्शक होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 1942 मध्ये डॉ. विक्रम साराभाई यांनी सुप्रसिद्ध भरतनाट्यम व कुचिपुडी नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. या दाम्पत्याला “कार्तिकेय’ आणि “मल्लिका’ ही दोन अपत्ये झाली. डॉ. विक्रम साराभाई यांचे कार्य कर्तृत्व व संशोधन बघून त्यांना 1956 साली अग्निबाण आणि क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने निमंत्रित केले. अणुऊर्जा क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण व्हावा या हेतूने डॉ. साराभाई यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. आज आपण अणुऊर्जेच्या क्षेत्रात जी महान कामगिरी केली आहे. त्याचा पाया डॉ. विक्रम साराभाई यांनी रचला आहे.

डॉ. विक्रम साराभाई यांनी भौतिक संशोधन प्रयोगशाळा, इंडियन इनिस्टट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद टेक्‍स्टाईल इंडस्ट्रियल रिसर्च असोसिएशन, सेंटर फॉर एनव्हायमेंटल प्लॅनिंग अँड टेक्‍नॉलॉजी, द विक्रमभाई कम्युनिटी रिसर्च सेंटर, आदी संस्थांची उभारणी केली. त्या आधारे भारताला विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी वाटचाल करण्यास मदत झाली. भारताचा पहिला उपग्रह “आर्यभट्ट’ 1975 साली सोडण्यात आला. पण त्याची संपूर्ण रचना व आराखडा डॉ. साराभाई यांचाच होता. अवकाश आणि अणुऊर्जा या दोन्ही क्षेत्रात अतिशय मूलभूत स्वरुपाचे काम करणारे डॉ. विक्रम साराभाई भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्षही होते.

डॉ. साराभाई हे शास्त्रज्ञ होते, तसेच उद्योजकही होते. आपल्या उद्योगपती वडिलांचा वारसा त्यांनी केवळ चालविलाच नाही तर व्यावसायिक विषयात व क्षेत्रात मोठी वाढ केली. रसायनापासून जीवनसत्वापर्यंतच्या अनेक क्षेत्रातील कारखाने काढले व विकसित केले. डॉ. साराभाई यांनी इस्त्रो, इंडियन इलेक्‍ट्रॉनिक्‍स डिफेन्स ऑर्गनायझेशन, द इलेक्‍ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इंडियन जिओफिजीकल युनियन अशा विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे संचालकपद भूषविले. त्यांना 1966 साली भारत सरकारने “पद्मभूषण’ तर 1972 साली मरणोत्तर “पद्मविभूषण’ या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना डॉ. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारापासून अवकाश विज्ञान, अणुविज्ञान, संशोधन या क्षेत्रातील विविध पुरस्कार मिळाले. डॉ. विक्रम साराभाईंच्या अफाट कर्तृत्वामुळेच आज आपला भारत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर आहे.

केरळजवळील थुंबा हे ठिकाण लॉन्च पेड़ साठी निश्‍चित झाले होते कारण हे ठिकाण मैग्नेटिक इक्वेटर लाइन (चुंबकीय भूमध्य रेखा) च्या अगदी जवळ होते. पण त्या ठिकाणी शंभरेक घरे आणी एक चर्च होत.आणी ते लोक तिथून बाजूला हटण्यास तयार नव्हते. त्या जागेच्या भौगोलिक आणि वैज्ञानिक महत्वामूळे त्या जागेसाठी केरळ सरकारची मदत मागितली गेली पण केरळ सरकारही ती जमीन मिळवण्यात अपयशी ठरले. मग एके दिवशी स्वत: विक्रम साराभाई गावकऱ्यांकडे गेले आणी त्यांना सगळे पटवून दिले आणी काय चमत्कार दुसऱ्याच दिवशी फादर आणि लोक तिथून बाजुला व्हायला तयार झाले. पुढे तिथे थुंबा रॉकेट लॉन्चिंग स्टेशनची स्थापना केली गेली आणि 21 नोव्हेंबर 1965 ला तिथून पहिल्या रॉकेटचे प्रक्षेपण केले गेले.

पुढे या केंद्राला संयुक्‍त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून मान्यता दिली. हा चमत्कार घडवणारे विक्रम साराभाईच. म्हणूनच की काय, या केंद्राला विक्रम साराभाई स्पेस सेंटर असे नाव दिले गेले. अवकाश संशोधनाची मुहूर्तमेढ रोवताना आपल्या तुटपुंज्या साधनसामग्रीतूनही एक मोठे स्वप्न पाहिलेल्या या द्रष्ट्या वैज्ञानिकासारखे अनेक महान संशोधक या भूमीत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानात भारत अग्रेसर होण्यात साराभाईसारख्यांचे मोठे योगदान आहे, हे आजच्या पिढीने तरी विसरता कामा नये.अशा या थोर शास्त्रज्ञाला अवघे 52 वर्षांचेच आयुष्य मिळाले. दि. 30 डिसेंबर 1971 रोजी केरळमधील “कोवालम’ येथे त्यांचे हृदयविकाराने झोपेतच निधन झाले. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन…!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)