#Ind_vs_Aus : भारताचा दणदणीत विजय; मालिका बरोबरीत राखण्यात भारताला यश

सिडनी – कृणाल पांडयाच्या भेदक गोलंदाजी नंतर कर्णधार विराट कोहलीच्या दमदार अर्धशतका च्या बळावर तिसऱ्या आणि निर्णायक टी- 20 सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 6 गडी राखून पराभूत करत तीन सामन्यांच्या टी – 20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारतासाठी या सामन्यात विराट कोहली नाबाद 61 धावा, शिखर धवन 41 धावा आणि कृणाल पांड्या 4 बळी यांनी भरीव कामगिरी केली. कृणाल पांड्याला सामनावीर तर शिखर धवनला मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आले.

नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारीत 20 षटकांत 6 बाद 164 धावा केल्या होत्या. तर, प्रत्युत्तरात खेळणाऱ्या भारतीय संघाने हे लक्ष्य 19.4 षटकांत 4 गड्‌यांच्या मोबदल्यात 168 धावाकरत पूर्ण करत सामन्यात विजय संपादन केला.

प्रत्युत्तरात फलंदाजीस आलेल्या भारताच्या सलामीवीरांनी आश्‍वासक सुरुवात केली. मागील काही सामान्यापासून चांगल्या लईत असलेल्या शिखर धवनने या सामन्यातही आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला. त्याच्या खेळीच्या बळावर धवन आणि रोहित शर्मा यांनी संघाला अर्धशतकी सलामी दिली. यावेळी धवन 22 चेंडूत ताबडतोब 41 धावा करून बाद झाला.

ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज भारतीय फलंदाजांना अडचणीत आणण्यात कमी पडत असल्याचे पाहून ऍरॉन फिंचने त्यांच्या गोलंदाजीच्या रणनीतीमध्ये बदल करत फिरकीपटू ऍडम झाम्पाकडे चेंडू सोपवला. त्याने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत रोहित शर्माला त्रिफळा बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला दुसरे यश मिळवून दिले. रोहित शर्मा 16 चेंडूत 23 धावा करून बाद झाला.

त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या कर्णधार विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकावर आलेल्या लोकेश राहुलने भारताचा डाव सांभाळला. परंतु, राहुल 14 धावा करून बाद झाला. तर, ऋषभ पंतला भोपळाही फोडता आला नाही. तो पहिल्याच चेंडूवर झेलबाद
होऊन माघारी परतला.

पंत आणि राहुल सलग चेंडूंवर बाद झाल्याने भारताची अवस्था 4 बाद 108 अशी झाली. यानंतर अनुभवी दिनेश कार्तिकआणि विराटने धावगती वाढवण्यावर भर दिला. प्रथम दिनेश कार्तिकने स्थिरावण्यास थोडा वेळ घेतला परंतु, नंतर त्यानेही आक्रमक पवित्रा अवलंबिला. दरम्यान विराटने आंतरराष्ट्रीय टी- 20 सामन्यातील आपले विक्रमी 19 वे अर्धशतक पूर्ण केले आणि भारताला विजयाच्या समीप नेले.

सलग दोन चेंडूवर चौकार खेचत विराट कोहली ने भारताला विजय मिळवून दिला. यावेळी विराटने 41 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या तर दिनेश कार्तिकने 18 चेंडूत नाबाद 22 धावांचे योगदान दिले. यावेळी दोघांनी 6.3 षटकांत 60 धावांची अभेद्य भागिदारी नोंदवली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या सलामीवीरांनी सार्थ ठरवत संघाला अर्धशतकी सलामी दिली. यावेळी भारताच्या खराब क्षेत्ररक्षणाचा देखील ऑस्ट्रेलियाला फायदा मिळाला. फिंचचा एक सोपा झेल रोहित शर्माने सोडला. परंतु, या संधीचे सोने करण्यात फिंच अपयशी ठरला आणि तो 28 धावा करून बाद झाला.

आजच्या सामन्यात ग्लेन मॅक्‍सवेलला फलंदाजीमध्ये बढती मिळाली. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आला. त्यानंतर संयमी फलंदाजी करणाऱ्या डी. शॉर्टने आपली विकेट गमावली. त्याला कृणाल पंड्याने पायचीत बाद केले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या बेन डरमॉटला कृणाल पांड्याने भोपळा फोडण्याची देखील संधी दिली नाही.

सलग दोन चेंडूवर दोन गडी बाद करत पांड्याने ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येवर खीळ बसवली. त्यानंतर कृणाल पांड्याने मॅक्‍सवेलला आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवत त्याला आपला तिसरा बळी बनवले. तर, विस्फोटक फलंदाज ख्रिस लीनला धावबाद करत भारताने क्षेत्ररक्षण सुधारले. अखेरच्या षटकांमध्ये मार्कस स्टोइनीस आणि नॅथन कुल्टर-नाईल यांनी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला 6 बाद 164 पर्यंत मजल मारून दिली. यावेळी भारताकडून कृनाल पांड्याने 36 धावांदेत चार गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक :

ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 6 बाद 164 (डार्सी शॉर्ट 33, ऍरोन फिंच 28, ऍलेक्‍स कॅरी 27, कृनाल पांड्या 36-4) पराभुत विरुद्ध भारत 19.4 षटकांत 4 बाद 168 (विराट कोहली नाबाद 61, शिखर धवन 41, रोहित शर्मा 23, दिनेश कार्तिक नाबाद 22, मॅक्‍सवेल 25-1).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
3 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)