#INDvENG : भारतीय महिलांचा इंग्लंड महिला संघावर दणदणीत विजय

मुंबई – एकता बिश्‍तच्या चार बळींच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने इंग्लंडच्या महिला संघाचा 66 धावांनी पराभव करत आयसीसी चॅम्पियन्सशीप मधील इंग्लडविरुद्धच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने सर्वबाद 202 धावांपर्यंत मजल मारली होती. कमी धावसंख्येचा बचाव करताना भारतीय महिलांनी चांगली गोलंदाजी केली. त्यात एकता बिश्‍तने चार बळी घेत सामनावीराचा पुरस्कार पटकाविला तर दीप्ती शर्मा आणि शिखा पांडे यांनीदेखील विजयात मोलाचा वाटा उचलला. इंग्लडचा संघ 41.1 षटकांत सर्वबाद 136 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाणेफेक जिकंत इंग्लडच्या महिलांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या स्मृती मंधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी सावध सुरुवात केली. दोनही सलामीवीरांनी जमिनीलगत फटके खेळण्यावर भर दिला. त्यामुळे भारतीयांनी अर्धशतकी सलामी दिली. त्यानंतर 15 व्या षटकात संघाची धावसंख्या 69 झाली असताना मंधनाला गॉर्जिया अल्विसने त्रिफळा बाद केले.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेली दीप्ती शर्माही स्वस्तात माघारी परतल्याने धावसंख्या वाढवण्याच्या मोहात जेमिमाही 48 धावांवर बाद झाली. हरलीन देओल 2 धावा आणि मोना मेश्राम शून्यावर बाद झाल्याने भारताची अवस्था 5 बाद 95 अशी झाली. त्यानंतर कर्णधार मिताली राज आणि तानिया भाटिया यांनी डाव सावरला. या दोघी बाद झाल्यावर झुलन गोस्वामीने 30 धावांची खेळी करत भारताला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला.

प्रत्युत्तरात विजयासाठी 203 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात खराब झाली. मध्यमगती गोलंदाज शिखा पांडेने इंग्लंडची सलामीवीर एमी जोन्सला एका धावेवर बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर साराह टेलरला 10 धावांवर पायचित करत तंबूचा रास्ता दाखवला. अन्य सलामीवीर टॉमी बेअमॉण्टचा अडसर दीप्ती शर्माने दूर करत इंग्लडची अवस्था 3 बाद 38 अशी केली. त्यानंतर कर्णधार हिदर नाईट आणि नताली स्किवर यांनी इंग्लडचा डाव सावरला.

स्किवर 44 धावांवर धावबाद झाल्यावर त्यांची 73 धावांची भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर अनुभवी डॅनिएली वॅट 1 धावेवर बाद झाल्यानंतर कॅथरीन ब्रन्ट 7 धावांवर मघारी परतली. तिला बिश्‍तच्या गोलंदाजीवर तानिया भाटियाने यष्टीचीत केले. लागलीच झूलन गोस्वामीने जॉर्जिया एल्विसचा 6 धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतरच्या तीनही महिला फलंदाजांना भोपळाही न फोडू देता बिश्‍तने बाद केले. कर्णधार हिदार नाईट 39 धावांवर नाबाद राहिली. इंग्लडच्या अखेरच्या सात महिला फालंदाज 25 धावांवर बाद झाल्याने इंग्लंडचा पराभव झाला.

संक्षिप्त धावफलक: भारतीय महिला संघ सर्वबाद 202- जेमिमा रॉड्रिग्ज (48 धावा) स्मृती मंधना (24) , दीप्ती शर्मा (7), मिताली राज (44) , हरलीन देओल (2), मोना मेश्राम (0), तानिया भाटिया (25), झुलन गोस्वामी (30), शिखा पांडे (11), पूनम यादव (0), एकता बिश्‍त नाबाद (0).

इंग्लंड : सर्वबाद 136 – एमी जोन्स (1), टॉमी बेअमॉण्ट (18), साराह टेलर (10), नताली स्किवर (44), डॅनिएली वॅट (1), कॅथरीन ब्रन्ट ( 7 ), जॉर्जिया एल्विस (6), अन्या श्रबसोल (0), सोफी एसीलस्टोन (0), अलेक्‍स हार्टले (0) , हिदार नाईट नाबाद 39 धावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)