#INDvNZ : मंधनाची पुन्हा चमकदार कामगिरी; भारताचा न्यूझीलंडवर विजय

दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकली 

-कर्णधार मिताली राजचे चमकदार अर्धशतक
-मंधना -मितालीची नाबाद 151 धावांची भागीदारी

माऊंट मोंगानुई: भारतीय पुरूष संघा पाठोपाठ महिला संघानेही न्यूझीलंडच्या महिला संघाचा पराभव करत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकी 2-0 अश्‍या फरकाने आपल्या नावे केली असून तब्बल 24 वर्षांनी भारतीय महिला संघाने न्यूझीलंडच्या भूमीत एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना न्युझीलंडला 44.2 षटकांत सर्वबाद 161 धावांचीच मजल मारता आल्याने भारतीय संघासमोर विजयासाठी 162 धावांचे आव्हान होते. प्रत्युत्तरात खेळताना भारतीय महिला संघाने हे आव्हान 35.2 षटकांत केवळ 2 गडी गमावून 166 धावा करत पुर्ण करुन दुसरा एकदिवसीय सामना आठ गडी आणि 88 चेंडू राखून पुर्ण करत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-0 अश्‍या फरकाने एकतर्फी खिशात घातली.

न्यूझीलंडच्या 161 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. भारताची सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्ज दुसऱ्याच षटकांत एकही धाव न करता परतली. तर, त्यानंतर आलेली दिप्ती शर्माही केवळ 8 धावाच करु शकली. त्यामुळे भारताची अवस्था 2 बाद 15 अशी झाली होती. त्यानंतर सलामीवीर स्मृती मंधना आणि कर्णधार मिताली राज यांनी सावध फलंदाजी करत संघाचा डाव सावरला.

यावेळी, तडाखेबाज फलंदाज मंधनानेही आक्रमक खेळ करणे टाळत एकेरी दुहेरी धावांवर भर देत भागीदारी करण्यावर जास्त भर दिला. त्यामुळे भारताचा डाव संथ झाला होता. पहिल्या दहा षटकांमध्ये भारतीय संघाने केवळ 29 धावांची मजल मारली होती. तर, 15.2 षटकांत भारताने अर्धशतकी वेस ओलांडली. दरम्यान मंधनाने 54 चेंडूंमध्ये 8 चौकारांच्या मदतीने आपले 14 वे अर्धशतक पूर्ण करत भारतीय संघाला शंभर धावांची वेस ओलांडून दिली.

यानंतर मंधनाने फटकेबाजी करत धावांचा वेग वाढवला. तर, दुसऱ्या बाजुने मितालीनेही खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेत 102 चेंडूत आपले 52वे अर्धशतक झळकावले. दरम्यान स्मृती मंधना आणि मिताली राज यांनी तिसऱ्या विकटसाठी नाबाद 151 धावांची भागिदारी रचत भारताला विजय मिळवून दिला. यावेळी मंधनाने 83 चेंडूत 13 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 90 धावा केल्या तर कर्णधार मिताली राजने 111 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 63 धावा करुन तिला चांगली साथ दिली.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली. त्यांची सलामीवीर सुझी बेट्‌स एकही धाव न करता माघारी परतली तर दुसरी सलामीवीर सोफी डिव्हाईनही केवळ 7 धावांची खेळी करुन बाद झाली. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या लॉरेन डाऊन आणि कर्णधार ऍमी सॅथरवेटने संघाचा डाव सावरण्याचे प्रयत्न केले. मात्र डाऊन 5 धावांवर असताना एकता बिश्‍तने तिला बद करत न्यूझीलंडला तिसरा धक्‍का दिला.

डाऊन बाद झाल्यानंतर क्रमांक चार आणि पाच नंबरवर उतरलेल्या फलंदाजांनी अनुक्रमे 1 आणि 9 धावांचीच खेळी केल्याने न्यूझीलंडची 5 बाद 63 अशी अवस्था झाली होती. यावेळी दुसऱ्या बाजुने त्यांची कर्णधार ऍमी सॅथरवेट संघाचा डाव सावरताना दिसून आली.

मात्र, इतर फलंदाजांना साजेशी कामगिरी करता न आल्याने ठरावीक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत होते. दरम्यान, ऍमी सॅथरवेटने 71 धावांची खेळी करत संघाला 161 धावांची मजल मारुन दिली. यावेळी भारताकडून झुलन गोस्वामीने 3 तर पूनम यादव, एकता बिश्‍त आणि दिप्ती शर्मायांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक –

न्यूझीलंड महिला संघ 44.2 षटकांत सर्वबाद 161 (ऍमी सॅथरवेट 71, लेंघ कॅस्पर्क 21, झुलन गोस्वामी 23-3, एकता बिश्‍त 14-2, दिप्ती शर्मा 51-2, पूनम यादव 38-2) पराभुत विरुद्ध भारतीय महिला संघ 35.2 षटकांत 2 बाद 166 (स्मृती मंधना नाबाद 90, मिताली राज नाबाद 63, लिआ ताहुहु 16-1, ऍना पिटरसन 26-1).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)