‘रहाणे-पंत’च्या दमदार फलंदाजीने भारताचे सामन्यात पुनरागमन

दुसऱ्या दिवस अखेर 4 बाद 308 धावांची मजल

हैदराबाद – नवोदित सलामीवीर पृथ्वी शॉ, उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे आणि ऋषभ पंत यांच्या फटकेबाजी नंतर भारताने कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 4 बाद 308 धावांपर्यंत मजल मारली असून भारतीय संघ अद्यापही वेस्ट इंडीजच्या धावसंख्ये पासून 3 धावांनी पिछाडीवर आहे.

कालच्या 7 बाद 295 धावांवरुन पुढे खेळताना दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजचा पहिला डाव 311 धावांत संपला. तर, 312 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने पहिल्या डावाची सुरुवात आक्रमक केली. सलामीला आलेल्या पृथ्वी शॉने आक्रमक फलंदाजी करत राहुलच्या साथीने 61 धावांची सलामी दिली त्यात पृथ्वीचेच योगदान जास्त होते.

याउलट लोकेश राहुलने 25 चेंडूत अवघ्या 4 धावा केल्या यावेळी तो पुन्हा त्रिफळाचीत झाला. राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या चेतेश्‍वर पुजाराने सावध पवित्रा घेतला मात्र पृथ्वीने आपली फटकेबाजी चालुच ठेवली. पहिल्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात तो शतक झळकावेल असे वाटत असताना जोमेल वॅर्रीकनने त्याला बाद करत भारताला दुसरा धक्‍का दिला.

यावेळी पृथ्वीने 53 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 70 धावांची वेगवान खेळी करताना आपले पहिले अर्धशतक नोंदवले. त्याच बरोबर पहिल्या दोन कसोटीत 50 हून अधिक धावा करणारा पृथ्वी आठवा फलंदाज ठरला आहे. याआधी दिलावर हुसेन, एजीके सिंग, सुनिल गावसकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, सुरेश रैना, रोहित शर्मा यांनी भारताकडून अशी कामगिरी केली होती.

दरम्यान पृथ्वी बाद झाल्या नंतर काही वेळातच पुजाराही बाद झाल्यामुळे चांगल्या सुरुवाती नंतरही भारताची 3 बाद 102 अशी छोतीशी घसरगुंडी उडाली. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे यांनी सावध पणे फलंदाजी करत भारतीय संघाचा डाव सावरायला सुरुवात केली. यादोघांमध्ये अर्धशतकी भागिदारी झाल्यानंतर वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने 45 धावांवर खेळणाऱ्या विराट कोहलीला बाद करत भारताला चौथा धक्‍का दिला. त्यामुळे भारताची 4 बाद 162 अशी अवस्था झाली होती.

यानंतर अजिंक्‍य रहाणे आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांनी भारताचा डाव सावरत आणखीन पडझड होऊ दिली नाही. अजिंक्‍य रहाणेने सावध फलंदाजी करण्याचा पवित्रा घेतला तर पंतने धावगती चांगली राखण्याकडे लक्ष दिले. त्यामुळे धावा करण्यात पंतने कमी वेळात रहाणेला गाठले आणि रहाणेच्या आधी आपले अर्धशतक पूर्ण केले. राहाणेला आपले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 122 चेंडू लागले तर पंतने आपले अर्धशतक 68 चेंडूत पूर्ण केले.

पंतने अर्धशतकानंतर आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. पंतने केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे भारत वेस्ट इंडीजच्या धावसंख्येच्या जवळ पोहोचला. याचबरोबर पंत त्याच्या कसोटीतील दुसऱ्या शतकाच्या जवळ पोहचला आहे. तर, अजिंक्‍य रहाणेही आपल्या दहाव्या शतकाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताने 4 बाद 308 धावा केल्या होत्या. यावेळी विंडीजकडे आता फक्त 3 धावांची आघाडी राहीली आहे. यावेळी ऋषभ पंत नाबाद 85 धावांवर पोहचला आहे. तर अजिंक्‍य रहाणे 75 धावांवर खेळत आहे.

तत्पूर्वी, कालच्या 7 बाद 295 धावांवरुन पुढे खेळताना दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजचा पहिला डाव 311 धावांत संपला. त्या धावसंख्येवरुन पुढे खेळताना आज मात्र त्यांना फार धावा जमवता आल्या नाहीत. पहिल्या दिवशी तिसऱ्या सत्रात काहीसे प्रभावहीन ठरलेल्या भारतीय गोलंदाजांनी आज दिवसाच्या सुरुवातीला शानदार कमबॅक केले आणि 16 धावांमध्ये विंडीजचे 3 गडी टिपले. पहिल्या दिवशी एका बाजूने किल्ला लढवणाऱ्या चेसने आपले शतक झळकावले.

पहिल्या दिवशी तिसऱ्या सत्रात विंडीजच्या होल्डरचेस जोडीने भारताच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला होता. होल्डर बाद झाल्यावरही चेसने एकाकी झुंज दिली आणि आपले शतक पूर्ण केले. त्याच्या शतकाच्या जोरावर विंडीजने त्रिशतकी मजल मारली. त्याने आपल्या 106 धावांच्या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. यावेळी भारताच्या उमेश यादवने डावात 6 बळी टिपले. तर कुलदीप यादवने 3 आणि अश्‍विनने 1 गडी बाद करत त्याला सुरेख साथ दिली.

वेट इंडीज पहिला डाव 101.4 षटकांत सर्वबाद 311 (रोस्टोन चेस 106, जेसन होल्डर 52, शाई होप 36, उमेश यादव 88-6, कुलदीप यादव 85-3, रविचंद्रन अश्‍विन 49-1).

भारत पहिला डाव 81 षटकांत 4 बाद 308 (ऋषभ पंत नाबाद 85, अजिंक्‍य रहाणे नाबाद 75, पृथ्वी शॉ 70, विराट कोहली 45, जेसन होल्डर 45-2).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)