पडझडीनंतर विंडीजची झुंज; पहिल्या दिवसअखेर 7 बाद 295 धावांची मजल

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज कसोटी क्रिकेट मालिका

हैदराबाद – हैदराबाद येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली असून पहिल्या दिवसअखेर वेस्ट इंडीजने 7 बाद 295 धावांपर्यंत मजल मारली असून पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा रोस्टोन चेस नाबाद 98 तर देवेंद्र बिशू नाबाद 2 धावांवर खेळात होते.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या विंडीजच्या संघाला याही सामन्यात चांगली सुरुवात करता आली नाही. सलामीला आलेल्या ब्रेथवेट आणि पॉवेल यांनी अवघ्या 32 धावांची सलामी दिली. पदार्पण करणारा जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरला त्याच्या दुसऱ्याच षटकात जायबंदी झाल्याने मैदान सोडावे लागले. त्यामुळे फिरकी गोलंदाज अश्‍विनला गोलंदाजीस लवकर पाचारण करण्यात आले. अश्‍विनने गोलंदाजीला आल्या आल्या लागलीच विंडीजचा सलामीवीर पॉवेलला 22 धावांवर माघारी पाठवले.

त्यानंतर गोलंदाजीस आलेल्या कुलदीप यादवने दुसरा सलामीवीर ब्रेथवेटला पायचीत पकडले. त्यामुळे आश्‍वासक सुरुवात झाली असे वाटत असतानाच 52 धावांवर विंडीजचे दोन फलंदाज माघारी परतले. त्यानंतर आलेल्या शाई होप आणि हेटमेयर विंडीजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, संघाची धावसंख्या 86 वर पोहलचली असता होपला उमेश यादवने पायचीत पकडले आणि उपहाराला जाण्यापूर्वी विंडीजला अजून एक धक्का दिला. त्यामुळे उपहाराच्या वेळी विंडीजची 3 बाद 86 अशी अवस्था झाली होती.

विंडीजचा निम्मा संघ माघारी गेल्यावर आलेल्या चेस आणि डोवरिचने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 69 धावांची भागिदारी केली. ही जोडी विंडीजला 200 धावांचा टप्पा पार करुन देणार असे वाटत असतानाच उमेश यादवने रिव्हर्स स्विंग करत डोवरिचला पायचीत पकडले. त्याने 30 धावा केल्या. डोवरिच बाद झल्यावर कर्णधार जेसन होल्डर फलंदाजीस आला. दरम्यान, चेसने आपले अर्धशतक पूर्ण केले. चहापानापर्यंत विंडीजच्या 6 बाद 197 धावा झल्या होत्या.

मात्र, तिसऱ्या सत्रात विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर आणि रोस्टन चेस या जोडीने भारताच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. या दोघांनी संयमाने फलंदाजी करताना आपापले अर्धशतक पूर्ण करत शतकी भागिदारी नोंदवली. मात्र, अर्धशतकी खेळी केल्यानंतर कर्णधार जेसन होल्डर 52 धावांवर बाद झाला. उमेश यादवने त्याला तंबूत धाडले. पण चेसने एका बाजूने किल्ला लढवला. सध्या चेस आपल्या चौथ्या कसोटी शतकापासून 2 धावा दूर आहे. तर देवेंद्र बिशू 2 धावांवर खेळत आहे.

तत्पूर्वी, या सामन्यात मुंबईकर शार्दूल ठाकूरला अंतिम संघात स्थान मिळाले आहे. मोहम्मद शमीला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे.पहिल्या लढतीत भारताने कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवताना विंडीजला एक डाव व 272 धावांनी पराभूत करत आपला शंभरावा कसोटी विजय संपादन केला होता. तर, 2011 च्या दौऱ्यात भारताने विंडीजला 2-0 असे नमवले होते, तर 2013 मध्ये त्यांनी दोन्ही कसोटी सामने तीन दिवसांच्या आतच संपवून विजयास गवसणी घातली होती. यंदाही भारताला ही सुवर्णसंधी आहे.

संक्षिप्त धावफलक – वेस्ट इंडीज पहिला डाव 95 षटकात 7 बाद 295 (रोस्टोन चेस नाबाद 98, जेसन होल्डर 52, शाई होप 36, शेन डोवरिच 30, उमेश यादव 83-3, कुलदीप यादव 74-3, रविचंद्रन अश्‍विन 49-1).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)