भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पहिल्याच दिवशी भारताचे वर्चस्व

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट मालिका

-पुजाराचे मालिकेत तिसरे शतक
-मयंक अग्रवालचे शतक हुकले
-पहिला दिवस अखेर भारत 4 बाद 303

सिडनी – बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील चौथ्या आणि अखेरच्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. यावेळी चेतेश्वर पुजाराने केलेली शतकी खेळी आणि त्याला मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारी यांच्याकडून मिळालेली सुरेख साथ यांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर चार बाद 303 धावांची मजल मारली असून भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ऐतिहासिक मालिका विजयाची संधी भारतीय संघाजवळ आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी स्विकारली. मात्र, भारताची सुरूवात पुन्हा एकदा निराशाजनक झाली. गेल्या काही दिवसांपासून अपयशाचा सामना करत असलेला लोकेश राहुल आज पुन्हा अपयशी ठरला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत राहुलला संघात स्थान मिलाले होते. सामन्याच्या दुसऱ्याच षटकात राहुल जोस हेझलवुडच्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात स्लिप मध्ये झेल देऊन बाद झाला. त्यानंतर आलेल्या पुजारा आणि मयंक अग्रवालने सावध फलंदाजी करताना डावाची सूत्रे हाती घेत ऑस्ट्रेलियाला लवकर यश मिळू दिले नाही. उपहारापर्यंत दोघांनी संथ खेळ केल्याने भारताच्या खात्यावर केवळ 69 धावा होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उपहारानंतर मयंक अग्रवालने फटकेबाजी करत मालिकेत सलग दुसऱ्या अर्धशतकाची नोंद केली. मयंक आक्रमक खेळी करण्याच्या नादात बाद झाला. आणि त्याचे पहिलेवहिले शतक केवल 23 धावांनी हुकले. मयंकला नॅथन लायनने बाद केले. आखूड टप्प्याच्या चेंडूवर जोरदार फटका मारण्याच्या नादात मयंक 77 धावांवर बाद झाला. हा फटका मारण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याने लायनला दोन षटकार खेचले होते. पुजारा आणि मयंकने दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली.

मयंक बाद झाल्यानंतर आलेल्या विराट कोहलीला चांगल्या सुरुवातीचा फायद घेण्यात अपयश आले. चहापानापर्यंत विराट आणि पुजाराने टिच्चून फलंदाजी केली. चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा भारताने 2 बाद 177 अशी मजल मारली होती. मयंक बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्‍वर पुजाराने तिसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागदारी केली. चहापानानंतर खेळाला सुरुवात झाल्यानंतर विराट पहिल्याच षटकांत परतला. यावेळी विराटने 59 चेंडूत 23 धावांची खेळी करत पुजाराच्या साथीत 54 धावांची भागिदारी नोंदवली.

विराटनंतर आलेला अजिंक्‍य रहाणे उसळता चेंडू सोडण्याच्या नादात 18 धावांवर स्टार्कचा बळी ठरला. त्यामुळे भारताची 4 बाद 228 अशी अवस्था झाली. यानंतर एक बाजू लावून धरलेल्या पुजाराने दिवसाच्या अखेरपर्यंत खिंड लढवत अखेरच्या सत्रात आपले आठरावे आणि मालिकेतील तिसरे शतक झळकावले. तर, मधल्याफळीत फलंदाजीला आलेल्या हनुमा विहारीने आक्रमक खेळी करत भारताला त्रिशतकी मजल मारून दिली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा शतकवीर पुजारा 130 आणि हनुमा विहारी 39 धावांवर नाबाद आहेत. तर, ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवुडने दोन बळी घेतले. नॅथन लायन आणि मिशेल स्टार्कने प्रत्येकी एक बळी घेतला.

संक्षिप्त धावफलक – भारत : पहिला डाव 90 षटकांत 4 बाद 303 (चेतेश्‍वर पुजारा नाबाद 130, मयंक अग्रवाल 77, हनुमा विहारी नाबाद 39, विराट कोहली 23, जोश हेझलवूड 51-2, मिचेल स्टार्क 75-1, नॅथन लायन 88-1).

रमाकांत आचरेकर यांना भारतीय संघाची मानवंदना

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी वयाच्या 87 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडीत, अजित आगरकर, बलविंदर सिंह संधू, संजय बांगर यांच्यासारख्या अनेक खेळाडूंची कारकिर्द आचरेकर सरांनी आपल्या हाताने घडवली. या सर्व खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे नाव मोठे केले.

सामन्याला सुरुवात झाल्यावर भारतीय संघ दंडावर काळ्या रिबीन बांधून मैदानात उतरला. यासंदर्भात बीसीसीआयने एक ट्‌विट करून माहिती दिली आहे. रमाकांत आचरेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी भारतीय संघातील खेळाडू मैदानात काळी पट्टी बांधून उतरले आहेत. असे बीसीसीआयने आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)