#INDvAUS : अंतिम सामन्यात विजय अनिवार्य

-भारत आणि ऑस्ट्रेलियामधे 2-2 बरोबरी

-लोकेश राहुल, ऋषभ पंतला अखेरची संधी

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाच्या संघाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करताना पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. त्यामुळे नवी दिल्लीतील फिरोजशाह कोटला येथे होणाऱ्या पाचव्या एकदिवसीय सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारी होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचे स्वप्न दोन्ही संघ पाहात आहेत आणि त्यासाठी ते आपले सर्वस्वपणाला लावतील यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघांना विजय अनिवार्य आहे.

स्थळ – फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
वेळ – दु. 1.30 वा

इंग्लंड येथे होणाऱ्या विश्‍वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मालिकेत आतापर्यंत दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केलेली आहे. मात्र, या मालिकेतील कामगिरीच्या जोरावर विश्‍वचषक स्पर्धेसाठीचा भारतीय संघ निवडण्यात येणार आहे. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ज्यामधे लोकेश राहुल आणि ऋषभ पंत या दोन खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. दोघांना आतापर्यंत ठिकठाक कामगिरी करता आलेली आहे आणि बुधवारी होणारा पाचवा सामना ही त्यांच्यासाठी अखेरची संधी असणार आहे. कारण, विराट कोहलीने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, आयपीएलमधील कामगिरी ही विश्‍वचषक

स्पर्धेसाठीच्या निवडीसाठी पात्र असणार नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात या दोघांनाही आपल्या कामगिरीतून कर्णधार कोहलीसह संघ व्यवस्थापनाला ते संघ निवडीसाठी पात्र असल्याचे दाखवून द्यावे लागणार आहे. यावेळी चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऋषभ पंतने एक स्टम्पिंगची संधी सोडतानाच मैदानावर चपळताही दाखवली नव्हती. त्यामुळे त्या सामन्यात त्याच्यावर बरीच टीका करण्यात आली होती. त्याचबरोबर त्याच्या या कामगिरीमुळे त्याच्याऐवजी दिनेश कार्तिकला संघात वापस बोलावण्यात यावे आणि त्याला विश्‍वचषकासाठी अंतिम संघात निवडावे असेही भारतीय क्रिकेटप्रेमींनी म्हटले होते. त्यामुळे या सामन्यात चांगली कामगिरी करून व्यवस्थापनाला आपल्यातील प्रतिभा दाखवून देण्याची त्याच्यासमोर अखेरची संधी असणार आहे.

त्याचबरोबर गत दोन सामन्यांमध्ये गोलंदाजांना आपल्या कामगिरीतून चमक दाखवता आली नसल्याने संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढलेली आहे. ज्यात तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 313 धावांचा रतीब वाटला होता. तर, चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजांना 358 धावांच्या लक्ष्याचाही बचाव करण्यात अपयश आले होते. ज्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना आपल्या कामगिरीतून चमक दाखवावी लागणार आहे. त्यातच मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या केदार जाधवने तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात खोऱ्याने धावा दिल्या असल्याने भारतीय गोलंदाजांवरील दडपणात वाढ झाली आहे.

त्याचबरोबर गत सामन्यात भारतीय सलामीवीरांनी नोंदवलेल्या 193 धावांच्या भागीदारीनंतर मधल्या फळीतील फलंदाजांना मोठ्या खेळी साकारण्यात अपयश आल्याने मधल्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरीकडे व्यवस्थापनाचे लक्ष असणार आहे. मधल्याफळीत चौथ्या क्रमांकासाठी संघ व्यवस्थापनाने तीन ते चार फलंदाजांना पर्याय म्हणून वापरून पाहिले होते.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायुडू, केदार जाधव, विजय शंकर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, ऋषभ पंत, सिद्धार्थ कौल, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा.

ऑस्ट्रेलिया : ऍरोन फिंच (कर्णधार), डार्सी शॉर्ट, शॉन मार्श, मार्कस स्टॉइनिस, उस्मान ख्वाजा, ऍलेक्‍स कॅरी, पीटर हॅंडस्कोम्ब, ऍश्‍टॉन टर्नर, ऍडम झम्पा, जेसन बेहरेनडॉर्फ, जाय रिचर्डसन, पॅट कमिन्स, अँड्रयू टाय, नॅथन कुल्टर-नाइल, नॅथन लायन.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)