भारताने जमिनीवर, हवेत आणि अंतराळातही सर्जिकल स्ट्राईक केला : पंतप्रधान नरेंद्र मोदी

“दमदार बीजेपी’ची पंतप्रधान मोदींकडून “दागदार ऑपोजिशन’शी तुलना

मीरत – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला सुरुवात केली. केंद्रातील समर्थ सरकारवर भर देताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाही चढवला. आपल्या सरकारने जमिनीवरून, हवेतून आणि अंतराळातूनही सर्जिकल स्ट्राईक करण्याचे धाडस दाखवले. सध्या होत असलेल्या निवडणूका “निर्णयक्षम सरकार’ विरोधात “अनिश्‍चिततेचा भूतकाळ’ अशी आहे, असे मोदी म्हणाले. भाजपच्या “विजय संकल्प रॅली’मध्ये ते बोलत होते.

चरण सिंहांचे स्मरण, महाआघाडीवर टीका…
पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचेही स्मरण केले. चरण सिंहांनी आयुष्यभर लोकांच्या कल्याणासाठीच काम केले. चरणसिंह यांचे पुत्र आणि राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख अजित सिंह यांनी लोकसभेच्या निवडणूकीसाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीबरोबर हातमिळवणी केली आहे. या तिन्ही पक्षांच्या आघाडीची “महामिलावट’ अशा शब्दामध्ये पंतप्रधानांनी संभावना केली. तसेच सपा- बस-बसपाची आघाडी म्हणजे “बुवा- भतिजा’ची आघाडी असल्याची टीकाही मोदींनी केली.

निवडणूकीमध्ये कोणाला मत द्यायचे आहे, हे देशवासियांनी ठरवले आहे. देशाच्या चौकीदाराच्या सरकारनेच जमीन, हवा आणि अंतराळात सर्जिकल स्ट्राईक करण्याचे धाडस दाखवले आहे. देशाचा विकास व्हायला हवा. शत्रूंपासून देश सुरक्षित रहायला हवा. कशा प्रकारे करून दाखवायचे, हे सर्वप्रथम देशवासियांनी अनुभवले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

यंदाची निवडणूक “दमदार बीजेपी’ विरुद्ध “दागदार विरोधी’ अशी असेल. एकीकडे विकास तर दुसरीकडे दृष्टीहीनता आहे. जे लोक लोकांसाठी बॅंक खातीही उघडू शकले नाहीत, ते आज लोकांच्या खात्यात थेट पैसे हस्तांतरण करण्याबाबत बोलत आहेत, अशा शब्दात कॉंग्रेसच्या किमान उत्पन्नाच्या योजनेवर त्यांनी टीका केली. “गरीबी हटाओ’चा नारा आपण लहानपणापासून ऐकत आहोत. मात्र गरिबी हटली नाही. कॉंग्रेसला हटवल्यासच गरिबी हटवली जाईल, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)