भारताने नन्नाच्या पाढ्यावरून पाकिस्तानला फटकारले 

नवी दिल्ली – दहशतवादी कारवायांबाबत नेहमीच नन्नाचा पाढा गिरवणाऱ्या पाकिस्तानने पुलवामा हल्ल्यातील जैश-ए-महंमद या संघटनेच्या सहभागाबाबत आणखी पुरावे मागितले आहेत. त्यावरून भारताने तीव्र शब्दांत पाकिस्तानला फटकारले आहे. पाकिस्तानस्थित जैशने मागील महिन्यात जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामात भयंकर दहशतवादी हल्ला घडवला. त्या हल्ल्याची जबाबदारी जैशने जाहीरपणे स्वीकारली.

त्यानंतर हल्ल्यातील जैशचा सहभाग अधोरेखित करणारी कागदपत्रे भारताने पाकिस्तानकडे सुपूर्द केली. त्यावर प्रतिसाद देताना पाकिस्तानने आणखी पुरावे मागितले. त्याबद्दल भारताकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. दहशतवादी कारवायांबाबत पाकिस्तानने नन्नाचा पाढा कायम ठेवला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या प्रतिसादाचे कुठलेच आश्‍चर्य आम्हाला वाटलेले नाही. पुलवामा घटनेला दहशतवादी हल्ला मानण्यासही पाकिस्तान तयार नाही, अशी बोचरी प्रतिक्रिया भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी दिली. जैशचे अड्डे पाकिस्तानात असून त्या संघटनेचा प्रमुख मसुद अझर त्या देशातच वास्तव्यास असल्याचे संपूर्ण जगाला ठाऊक आहे. पाकिस्तानने स्वत:च्या भूमीत सक्रिय असणाऱ्या दहशतवाद्यांवर कुठली विश्‍वासार्ह कारवाई केली का यासंदर्भात कुठलीही माहिती दिली नसल्याकडेही कुमार यांनी लक्ष वेधले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)