भारत अ संघाची विजयाकडे वाटचाल; दक्षिण आफ्रिका अ संघ 239 धावांनी पिछाडीवर

बंगळुरू: भारत अ संघाने आपला पहिला डाव 8 बाद 584 धावांवर घोषित केल्यानंतर येथे सुरू असलेल्या चार दिवसीय अनधिकृत कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका अ संघाने तिसऱ्या दिवसअखेर 4 बाद 99 धावांपर्यंत मजल मारली असून भारताला विजयासाठी 6 गडी बाद करण्याची गरज आहे. तर अद्याप 239 धावांनी पिछाडीवर असलेल्या आफ्रिकेला अखेरचा पूर्ण दिवस फलंदाजी करावी लागणार आहे.

भारतीय संघाने आपला पहिला डाव घोषित केल्यानंतर 338 धावांच्या पिछाडीवरून फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेच्या संघाची दुसऱ्या डावातील सुरुवात निराशाजनक झाली. त्यांच्या सलामीवीरांसह कर्णधार खाया झोंडो संघाच्या 6 धावा असतानाच तंबूत परतल्याने त्यांची 3 बाद 6 अशी पडझड झाली होती. मात्र त्यानंतर झुबेर हम्झा आणि सेनुरन मुत्थुस्वामीने सावध खेळ करत संघाचा डाव सावरला.

-Ads-

आजच्या दिवसाचा खेळ संपायला तीन षटके बाकी असताना सेनुरन मुत्थुस्वामी 41 धावांवर बाद झाला. मुत्थुस्वामीने हम्झासोबत 27.4 षटकांत 86 धावांची भागीदारी केली. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा आफ्रिकेच्या 4 बाद 99 धावा झाल्या होत्या. यावेळी हम्झा 46 तर सेकंड 4 धावा करून खेळत होते. तर भारताच्या मोहम्मद सिराजने 18 धावा देत 4 गडी बाद केले आहेत.

तत्पूर्वी, कालच्या 2 बाद 411 धावांवरून पुढे खेळताना आज सकाळी भारताचा द्विशतकवीर मयंक अग्रवाल पहिल्याच षटकात बाद झाला. मयंकने 251 चेंडूंत 31 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 220 धावा केल्या. त्यावेळी भारताच्या 412 धावा झाल्या होत्या. यानंतर हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर यांनी सावधपणे फलंदाजी करत संघाची आगेकूच कायम राखली. मात्र संघाच्या 440 धावा झाल्या असताना कर्णधार अय्यर 24 धावांवर असताना बाद झाला. त्याने विहारी सोबत 28 धावांची भागीदारी केली.

त्यानंतर विहारीने यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भारतला साथीत घेऊन संघाचा धावफलक हलता ठेवण्याचे काम करत भारत अ संघाला 500 धावांचा टप्पा गाठून दिला. यावेळी दोघांनीही वेगाने धावा करण्यावर भर दिला होता. संघाच्या 535 धावा झाल्या असताना फटकेबाजी करणारा श्रीकर बाद झाला. त्याने विहारीसोबत 22 षटकांत 95 धावांची वेगवान भागीदारी नोंदवली. श्रीकरने 77 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 64 धावांची खेळी केली.

यानंतर अक्षर पटेल आणि विहारी यांनी फटकेबाजी करत 9 षटकांत 43 धावांची वेगवान भागीदारी केली. विहारी धावबाद झाल्याने ही भागीदारी तुटली. विहारीने 108 चेंडूंत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. तर त्यानंतर आलेले मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चाहल एकही धाव न करता बाद झाल्यावर भारत अ संघाने आपला पहिला डाव 8 बाद 584 धावांवर घोषित केला. यावेळी अक्षर पटेल 33 धावांवर नाबाद राहिला. यावेळी दक्षिण आफ्रिकेकडून ब्युरेन हेंड्रिक्‍झने 98 धावांत 3 गडी बाद केले तर डुआन्ने ऑलिव्हरने 88 धावा देत दोन गडी बाद करून त्याला सुरेख साथ दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)