चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा : अखेरच्या दीड मिनिटात भारताने गमावली विजयाची संधी 

ब्रेडा (हॉलंड): चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत भारताने बेल्जियमविरुद्ध विजयाची संधी गमावली. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या लढतीत बेल्जियमने शेवटच्या मिनिटाला गोल करून भारताला 1-1 अशा बरोबरीत रोखले. त्यामुळे भारताला हातात आलेल्या विजयावर पाणी सोडावे लागले.
भारताकडून हरमनप्रीत सिंगने 10व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवला होता. मात्र सामना संपण्यास दीड मिनिट बाकी असताना बेल्जियमने पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन बरोबरी साधली. भारताकडून पी. आर. श्रीजेश आणि बचावफळीने तोपर्यंत उत्कृष्ट कामगिरी करताना बेल्जियमची सर्व आक्रमणे परतवून लावली होती. मात्र अखेरच्या काही मिनिटांमध्ये भारताचा बचाव अपुरा ठरला.
बेल्जियमकडून लुयपार्टने 59 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. 60व्या मिनिटाला बेल्जियमला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिऴाला, परंतु गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने सुरेखरीत्या तो अडवत भारताचा पराभव टाऴला. या निकालानंतरही भारताच्या अंतिम फेरीच्या आशा जिवंत आहेत. मात्र त्यासाठी शनिवारी त्यांना हॉलंडशी किमान बरोबरी साधावी लागेल.
तत्पूर्वी सामन्याच्या सुरुवातीपासून भारतीय संघाने आपलं वर्चस्व कायम राखले होते. जागतिक क्रमवारीत बेल्जियमसचा संघ भारतापेक्षा वरच्या स्थानावर आहे, मात्र आजच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी शिस्तबद्ध खेळाचे प्रदर्शन करताना बेल्जियमच्या खेळाडूंना पुरते कोंडीत पकडले. मनदीप सिंग, एस. व्ही. सुनील यांनी पहिल्या सत्रात भारताला पेनल्टी कॉर्नरच्या चांगल्या संधी निर्माण करून दिल्या. त्यातच 10व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन भारताला 1-0 अशी आघाडीही मिळवून दिली.
या आघाडीनंतर बेल्जियमचा संघ सामन्यात आक्रमक झाला. मात्र भारतीय संघाचा कर्णधार आणि गोलरक्षक श्रीजेशने भारताचा बचाव सांभाळला होता. जॉन जॉन डोमेन आणि अन्य बेल्जियम खेळाडूंची सर्व आक्रमणेभारतीय बचावफळीने थोपवून धरली. सामन्यात अखेरच्या सत्रापर्यंत भारताने सामन्यात 1-0 अशी आघाडी कायम ठेवली होती. त्यामुळे हा सामना भारत जिंकणार असे वाटत असतानाच, अखेरच्या मिनिटांत बेल्जियमच्या खेळाडूंनी पेनल्टी कॉर्नरची कमाई केली. मात्र यावेळी बेल्जियमचे आक्रमण थोपवणे श्रीजेशला जमले नाही. 59 व्या मिनीटाला लुयपार्टने बेल्जियमला बरोबरी साधून दिली. आता भारताचा सामना उद्या (शनिवार) हॉलंडशी होणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)