पाकिस्तानला पुलवामा हल्ल्याशी संबंधित पुरावे देण्यास भारत अनुत्सूक

पूर्वानुभव चांगला नाही; त्या देशाचा खरा चेहरा आणणार समोर

नवी दिल्ली – पाकिस्तानबाबतचा पूर्वानुभव चांगला नसल्याने पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी संबंधित पुरावे त्या देशाला भारताकडून दिले जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. पाकिस्तानला पुरावे देण्याऐवजी त्या देशाचा खरा चेहरा समोर आणण्याच्या उद्देशातून भारत मित्रदेशांपुढे वस्तुस्थिती मांडणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामात 14 फेब्रुवारीला झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली. त्यानंतरही भारताने पुरावे दिल्यास कारवाई करू, अशी ढोंगी भूमिका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, पाकिस्तानला पुरावे देऊन काही निष्पन्न होणार नसल्याचे केंद्र सरकारचे मत बनल्याची माहिती सुत्रांनी दिली. मुंबईतील महाभयंकर दहशतवादी हल्ले (26/11) आणि पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यात पाकिस्तानस्थित घटकांचा हात असल्याचे तेव्हाच उघड झाले. त्यासंबंधीच्या पुराव्यांचा समावेश असलेली कागदपत्रे पाकिस्तानला सादर करण्यात आली. मात्र, त्या देशाने कुठलीच पाऊले उचलली नाहीत.

मुंबईतील हल्ले पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने घडवले. त्याबाबतचे पुरेसे पुरावे देऊनही पाकिस्तानने तोयबाचा संस्थापक हाफिज सईद याच्यावर कुठलीच कारवाई केली नाही. पठाणकोट हल्ल्याच्या संदर्भात भारताने पाकिस्तानच्या तपास पथकाला घटनास्थळी भेट देण्याची परवानगी दिली. मात्र, मायदेशी परतल्यावर त्या तपास पथकाने पाकिस्तानस्थित दहशतवादी हवाई तळाच्या परिसरात घुसल्याचा पुरावा देण्यात भारतीय अधिकाऱ्यांना अपयश आल्याचे म्हटले. ते अनुभव ध्यानात घेता पाकिस्तानला पुलवामा हल्ल्याबाबत पुरावे देण्यात काहीच अर्थ नसल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)