भारतीय हद्दीत हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारताने हाणून पाडला

पाकिस्तानचे एक विमान पाडले

भारताचेही एक विमान पाकिस्तानी हद्दीत पडले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवी दिल्ली  – भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईवर प्रतिक्रीया म्हणून पाकिस्तानच्या हवाईदलाने आज भारतीय हद्दीत घुसुन लष्करी स्थळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय हवाईदलाने हा हल्ला तत्परतेने परतवून लावला असे भारतातर्फे सांगण्यात आले आहे. या गडबडीत भारताचे एक विमान पडले असून पाकिस्तानचे एक विमान पाडण्यात यश आल्याचा दावाही भारताने केला आहे.

भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी आज हवाईदलाचे उपप्रमुख एअर व्हाईस मार्शल आर.जी. के कपुर यांच्या समवेत दुपारी एक पत्रकार परिषद घेऊन सीमेवरील घडामोडींच्या संबंधात एक त्रोटक निवेदन जारी केले. त्यात रविशकुमार यांनी सांगितले की भारताने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी आज सकाळी पाकिस्तानने हवाईदलाच्या मदतीने काही भारतीय लष्करी ठाण्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न भारताने यशस्वीपणे हाणून पाडला.

या हवाई चकमकीच्यावेळी भारतीय हवाईदलाच्या मिग 21 बिशन लढाऊ विमानाने एक पाकिस्तानी विमान पाडले. हे विमान पाकिस्तानी हद्दीत पडताना भारताच्या सैन्याने पाहिले आहे. या गडबडीत भारताचेही एक मिग 21 विमान दुर्देवाने गमावले गेले असून त्या विमानाचा पायलट बेपत्ता आहे. या पायलटला आपण ताब्यात घेतले असल्याचा दावा पाकिस्तानने केला असून त्यांच्या दाव्याची आम्ही शहानिशा करीत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. या छोट्या निवेदनानंतर अधिकृत सरकारी निवेदन संपले. या दोन्ही अधिकाऱ्यांनी पत्रकारांना कोणतेही प्रश्‍न विचारण्यास मनाई केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)