भारत-इंग्लंड यांच्यात नव्या आव्हानाला प्रारंभ

पहिली एकदिवसीय लढत आज रंगणार

नॉटिंगहॅम: टी-20 मालिकेत विजय मिळविल्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या भारतीय संघासमोर आज (गुरुवार) सुरू होत असलेल्या एकदिवसीय मालिकेत पुन्हा एकदा इंग्लंडचे जबरदस्त आव्हान आहे. यानंतरची एकदिवसीय विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा पुढच्या वर्षी अगदी याच कालावधीत इंग्लंडमध्ये रंगणार आहे. त्यामुळे विराट कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांना इंग्लंडमधील त्या काळातील हवामान आणि खेळपट्ट्यांचा अंदाज घेण्याची ही नामी संधी आहे.

भारतीय संघाने टी-20 मालिकेत इंग्लंडला 2-1 असे नमविले असले, तरी एकदिवसीय विश्‍वक्रमवारीत अग्रस्थानावर असलेला इंग्लंडचा संघ सध्याचा सर्वोत्तम वन डे संघ समजला जातो. जोस बटलर, जेसन रॉय, अलेक्‍स हेल्स, जॉनी बेअरस्टो आणि इयान मॉर्गन यांच्या फळीत बेन स्टोक्‍सचे नाव जोडल्यास भारतीय गोलंदाजांसमोर किती खडतर आव्हान आहे याची कल्पना येते.

 

इंग्लंडने काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा 6-0 असा धुव्वा उडविला होता. अत्यंत निराशाजनक अशा 2015 विश्‍वचषक स्पर्धेनंतर इंग्लंडने 69 पैकी 46 एकदिवसीय सामने जिंकताना अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांनी या काळात तब्बल 31 वेळा 300 पेक्षा अधिक धावसंख्या उभारताना त्यातील 23 सामने जिंकले. इंग्लंडने 11 वेळा 350 पेक्षा अधिक धावसंख्या उभारली, तसेच त्यांनी तीनदा 400 धावांचा टप्पा ओलांडला.

द्विपक्षीय मालिकेतील इंग्लंडचा अखेरचा पराभव जानेवारी 2017 मध्ये भारताविरुद्धचा होता. दरम्यान त्यांना स्कॉटलंडविरुद्ध सनसनाटी पराभव पत्करावा लागला. परंतु हा केवळ अपवादच होता. त्यांची फलंदाजीची फळी जगातील कोणत्याही आक्रमणाच्या चिंधड्या उडविण्यासाठी सक्षम आहे. तसेच इंग्लंडच्या गोलंदाजीतही वेगवान व फिरकी माऱ्याचा चांगला संगम आहे.

प्रतिस्पर्धी संघ –
भारत – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, सुरेश रैना, हार्दिक पांड्या, युझवेंद्र चाहल, कुलदीप यादव, सिद्धार्थ कौल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, उमेश यादव, शार्दूल ठाकूर व भुवनेश्वर कुमार.

इंग्लंड – इयान मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर (यष्टीरक्षक), मोईन अली, जो रूट, जेक बॉल, टॉम करन, ऍलेक्‍स हेल्स, लियाम प्लंकेट, बेन स्टोक्‍स, आदिल रशीद, डेव्हिड विली व मार्क वूड.
सामन्याची वेळ- सायंकाळी 5-00 पासून.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)