भारताचा सात गडी राखून विजय

-तिसऱ्या सामन्यातही न्यूझीलंडला एकतर्फी लोळवले
-विराटच्या नेतृत्वाखाली संघाची विजयी घोडदौड सुरुच

माऊंट मोंगानुई – गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीनंतर फलंदाजांच्या प्रभावी कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने न्यूझीलंडचा 7 गडी आणि 42 चेंडू राखून पराभव करताना पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. यावेळी सामन्यात 3 बळी मिळवणाऱ्या मोहम्मद शमीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे न्यूझीलंडच्या भूमीवर विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला तब्बल दहा वर्ष वाट पहावी लागली. 2008-09 साली भारताने न्यूझीलंडमध्ये 3-1 च्या फरकाने एकदिवसीय मालिका जिंकली होती.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला 49 षटकांत सर्वबाद 243 धावांची मजल मारता आली. त्यामुळे भारतीय संघासमोर विजयासाठी 244 धावांचे आव्हान होते. प्रत्युत्तरात खेळताना भारताने हे आव्हान 43 षटकांत 3 बाद 245 धावाकरून पूर्ण करत तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासह पाच सामन्यांची मालिका आपल्या खिशात घातली.
न्यूझीलंडच्या 243 धावांचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली. दोन्ही सलामीवीरांनी पहिल्याच षटकापासून आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, शिखर धवन संघाच्या 39 धावा झाल्या असताना 28 धावा करून बाद झाला. शिखर बाद झाल्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माने डावाची सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली. यावेळी दोघांनीही संयमी खेळ करत भागीदारी करण्यावर आपला भर ठेवला. त्यामुळे दोघांनीही न्यूझीलंडला आणखीन बळी मिळू दिला नाही. यावेळी हे दोघेही भारताला विजयापर्यंत पोहचवतील असे वाटत असतानाच 62 धावांवर खेळणाऱ्या रोहितला बाद करत सॅंटेनरने न्यूझीलंडला दुसरा बळी मिळवून दिला. यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी 20.3 षटकांत 113 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

तर यानंतर थोड्याच वेळात 60 धावांवर खेळणाऱ्या विराटला बाद करत बोल्टने भारताला तिसरा धक्‍का दिला. त्यानंतर आलेल्या अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक यांनी सावध फलंदाजी करत संघाची आणखी पडझड होऊ न देता. चौथ्या विकेटसाठी नाबाद 77 धावांची भागीदारी रचत भारताला सामन्यासह मालिका जिंकून दिली. यावेळी रायडूने नाबाद 40 तर दिनेश कार्तिकने नाबाद 38 धावांचे योगदान दिले. तर, ट्रेंट बोल्टने 40 धावा देत भारताचे दोन गडी बाद केले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मोहम्मद शमीने दुसऱ्याच षटकांत त्यांचा सलामीवीर कॉलिन मुनरोला 7 धावांवर बाद करत पहिला धक्‍का दिला. तर, दुसरा सलामीवीर मार्टिन गुप्टिलला 13 धावांर बाद करत भुवनेश्‍वरने न्यूझीलंडला दुसरा धक्‍का दिला. दोन्ही सलामीवीर स्वस्तात परतल्यानंतर कर्णधार केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांनी सावधपणे फलंदाजी करत डाव सावरायला सुरुवात केली.

मात्र, चहलच्या गोलंदाजीवर कर्णधार विल्यम्सन हार्दिक पांड्याकडे झेल देत परतला. यावेळी त्याने 28 धावांची खेळी केली. यानंतर आलेल्या टॉम लॅथम आणि टेलरने सावध फलंदाजी करत पडझड रोखण्याचा प्रयत्न केला. मागिल दोन्ही सामन्यात अपयशी ठरलेल्या रॉस टेलरने या सामन्यात अर्धशतक झळकावत न्यूझीलंडला सावरले. त्याला टॉम लॅथमनेही अर्धशतक करत चांगली साथ दिली. मात्र, लॅथम चहलच्या गोलंदाजीवर अर्धशतकानंतर लगेचच बाद झाला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी रचली.

लॅथम पाठोपाठ हेन्री निकोलसही हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक दिनेश कार्तिककडे झेल देत माघारी परतला. लागोपाठ दोन गडी परतल्याने न्यूझीलंडच्या धावगतीला ब्रेक लागला. एका बाजूने विकेट जात असताना रॉस टेलर चांगली फलंदाजी करत होता. मात्र, टेलर 93 धावांवर पोहलचा असताना शामीने त्याला कार्तिक करवी झेलबाद करत न्यूझीलंडला मोठा धक्‍का दिला.

टेलर बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. यावेळी भारताकडून मोहम्मद शामीने तीन तर भुवनेश्‍वर कुमार, हार्दिक पांड्या आणि चहलने प्रत्येकी दोन बळी टिपले.

संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड 49 षटकांत सर्वबाद 243 (रॉस टेलर 93, टॉम लॅथम 51, केन विल्यम्सन 28, मोहम्मद शमी 41-3, हार्दिक पांड्या 45-2, भुवनेश्‍वर कुमार 46-2) पराभूत विरुद्ध भारत 43 षटकांत 3 बाद 245 (रोहित शर्मा 62, विराट कोहली 60, अंबाती रायुडू 40, दिनेश कार्तिक 38, ट्रेंट बोल्ट 40-2).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)