#NZvIND : भारताचा न्यूझीलंडवर 90 धावांनी विजय

पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी

माऊंट मोंगानुई – फलंदाजांनी केलेल्या धमाकेदार कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने शनिवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडला 90 धावांनी पराभुत करत पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0ने आघाडी घेतली असून भारतीय संघ आता मालिका विजयापासून केवळ एक पाऊल दुर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाणेफेके जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारीत 50 षटकांत 4 बाद 324 धावांची मजल मारत न्युझीलंड समोर विजयासाठी 325 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात खेळताना न्युझीलंडला 40.2 षटकांत सर्वबाद 234 धावांचीच मजल मारता आल्याने त्यांना 90 धावांनी पराभुत व्हावे लागले.

यावेळी, न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. संघाच्या 23 धावा झाल्या असताना त्यांचा सलामीवीर मार्टिन गुप्टीलला बाद करत भुवनेश्‍वर कुमारने भारताला पहिला बळी मिलवून दिला. त्यानंतर आलेल्या कर्णधार केन विल्यम्सनने फटकेबाजी करताना न्यूझीलंडला अर्धशतकी टप्पा ओलांडून दिला. मात्र, शमीच्या गोलंदाजीवर विल्यम्सनही बाद झाला. त्यामुळे 7.4 षटकांत अर्धशतक ओलांडलेल्या न्युझिलंडची 2 बाद 51 अशी अवस्था झाली होती. त्यामुळे न्यूझीलंडने जरी 6 च्या रनरेटने धावा करण्यास सुरुवात केली असली तरी त्यांनी आपल्या विकेटही गमावण्यास सुरुवात केली होती. त्यांचा ठरावीक अंतराने विकेट पडण्याचा हा सिलसिला सुरूच राहिला. रॉस टेलर, टॉम लॅथम आणि हेन्री निकोलस यांनी भागिदारी रचण्याचे प्रयत्न केले.

मात्र, भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजी समोर त्यांना जास्त काळ टिकाव धरता आला नाही. त्यामुळे न्युझिलंडची 6 बाद 146 धावा अशी खराब अवस्था झाली असताना आलेल्या डग ब्रेसवेलने एकाकी लढत देत न्युझीलंडला 200 धावांच्या पार पोहचवले. मात्र, ब्रेसवेलला बाद करत भुवनेश्‍वरने न्युझीलंदला पुन्हा मोठा धक्‍का दिला. ब्रेसवेलने 46 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 57 धावांची आक्रमक खेळी केली. ब्रुसवेल बाद झाल्यावर चहलने फर्गुसनला बाद करत न्यूझीलंडला 234 धावात गुंडाळले.

या सामन्यात भारताच्या फिरकी गोलंदाजांनी सात बळी घेतले. कुलदीप यादवने चार बळी तर चहलने दोन आणि केदार जाधवने एक बळी घेत कुलदीपला चांगली साथ दिली. याशिवाय भुवनेश्‍वरने दोन आणि शमीने एका फलंदाजाला बाद केले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाच्या सलामीवीरांनी संघाला धडाकेबाज सुरूवात करुन दिली. दोघांनीही संघाला 154 धावांची सलामी दिली. यावेळी 66 धावांची खेळी करुन शिखर परतला. तर, 87 धावा करुन रोहित देखिल बाद झाल्यानंतर, कर्णधार विराट कोहली आणि अंबाती रायुडूयांनी संघाचा डाव सावरायला सुरूवात केली.

मात्र, दोघेही आपले अर्धशतक पुर्न करु शकले नाही. दोघांनी अनुक्रमे 43 आणि 47 धावांची खेळी केली. दोघेही बाद झाल्यानंतर आलेल्या धोनी आणि केदार जाधव यांनी तुफान फटकेबाजी करत संघाला 324 धावांची मजल मारुन दिली. यावेली धोनीने 33 चेंडूत 48 तर केदार जाधवने 10 चेंडूत 22 धावांची खेळी केली. यावेळी न्युझीलंडकडून ट्रेंट बोल्ट आणि ल्युक फर्ग्युसनयांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक – भारत 50 षटकांत 4 बाद 324 (रोहित शर्मा 87, शिखर धवन 66, महेंद्रसिंग धोनी नाबाद 48, रायुडू 47, ट्रेंट बोल्ट 61-2) विजयी विरुद्ध न्युझीलंड 40.2 षटकांत सर्वबाद 234 (डग ब्रेसवेल 57, टॉम लॅथम 34, कॉलिन मुन्रो 31, कुलदीप यादव 45-4, भुवनेश्‍वर कुमार 42-2).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)