भारत अ संघाचा दक्षिण आफ्रिकेवर डावाने विजय

पहिला अनधिकृत कसोटी सामना मोहम्मद सिराजचे सामन्यांत मिळून 10 बळी

बंगळुरू: मोहम्मद सिराज आणि रजनीस गुरबानी यांच्या भेदक माऱ्यामुळे पहिल्या अनधिकृत कसोटी क्रिकेट सामन्यात भारत अ संघाने दक्षिण अफ्रिका अ संघाचा एक डाव आणि 30 धावांनी पराभव केला. या विजयामुळे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत अ संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज अखेरच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाला 6 गडी बाद करायचे होते तर आफ्रिकेच्या संघाला संपूर्ण दिवस खेळून काढायचा होता. चार बाद 99 वरून पुढे खेळताना झुबेर हम्झा आणि सेकंड यांनी सावध फलंदाजी करताना दक्षिण अफ्रिका अ संघाला शंभरी गाठून दिली. मात्र 63 धावांवर खेळणाऱ्या हम्झाला बाद करत रजनीश गुरबानीने भारतीय चमूत आनंदाचे वातावरण निर्माण केले.

हम्झाने 126 चेंडूंत 63 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. सेकंडने शॉन वॉन बर्गला सोबतीस घेऊन 50.4 षटकांत 119 धावांची भागीदारी करतान भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजविले होते. मात्र बर्गचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर गुरबानीने त्याला बाद करीत भारताला मोठे यश मिळवून दिले. बर्गने 175 चेंडूत सहा चौकारांसह 50 धावांची संथ परंतु महत्त्वपूर्ण खेळी केली. एका बाजूने नांगर टाकून फलंदाजी करणारा सेकंड पहिल्या डावात हुकलेले आपले शतक दुसऱ्या डावात पूर्ण करण्याच्या तयारीत होता. मात्र 94 धावांवर असणाऱ्या सेकंडला बाद करत चाहलने भारताच्या विजयातील अडथळा दूर केला.

यानंतर तळातील फलंदाजांनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना जास्त वेळ लागला नाही आणि भारत अ संघाने हा सामना एक डाव आणि 30 धावांनी आपल्या नावे केला. यावेळी भारताच्या मोहम्मद सिराजने 73 धावा देत दक्षिण अफ्रिका अ च्या 5 फलंदाजांना माघारी धाडले तर गुरबानीने 45 धावांत 2 गडी बाद करत त्याला सुरेख साथ दिली. दरम्यान मोहम्मद सिराजने दोन्ही डावात मिळून 10 बळी मिळवत भेदक गोलंदाजी केली. तत्पूर्वी, तिसऱ्या दिवशीच्या खेळात भारतीय संघाने आपला पहिला डाव 8 बाद 584 धावांवर घोषित केल्यानंतर दक्षिण अफ्रिकेने काल दिवसअखेर 4 बाद 99 धावांपर्यंत मजल मारली होती. तब्बल 338 धावांच्या पिछाडीवरून फलंदाजी करणाऱ्या अफ्रिकेच्या संघाची दुसऱ्या डावातील सुरूवात निराशाजनक झाली.

त्यांच्या सलामीवीरांसह कर्णधार खाया झोंडो संघाच्या 6 धावा असतानाच तंबूत परतल्याने त्यांची 3 बाद 6 अशी पडझड झाली होती. झुबेर हम्झा आणि सेनुरन मुत्थुस्वामीने संघाचा डाव सावरला. मात्र दिवसाचा खेळ संपायला तीन षटके बाकी असताना सेनुरन मुत्थुस्वामी 41 धावांवर बाद झाला. त्याने हम्झा सोबत 27.4 षटकांत 86 धावांची भागीदारी केली. यावेळी भारताच्या मोहम्मद सिराजने 18 धावा देत 4 गडी बाद केले होते. तत्पूर्वी भारतीय संघाच्या पहिल्या डावात द्विशतकवीर मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांच्या फलंदाजी नंतर श्रीकर भारतच्या फटकेबाजी ने भारताने 584 धावांपर्यंत मजल मारत भारतीय संघाला पहिल्या डावात 338 धावांची आघाडी मिळवून दिली होती. मयंकने 251 चेंडूत 31 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 220 धावा केल्या होत्या. तर पृथ्वी शॉने 196 चेंडूत 20 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 136 धावांची खेळी केली होती.तर श्रीकरने 77 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 64 धावांची वेगवान खेळी केली. यावेळी दक्षिण अफ्रिकेकडून ब्युरेन हेंड्रिक्‍झने 98 धावांत 3 गडी बाद केले तर डुआन्ने ऑलिव्हरने 88 धावा देत दोन गडी बाद करत त्याला सुरेख साथ दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)