भारत’अ’ वि. न्यूझीलंड’अ’ तिसरा कसोटी सामना अनिर्णीत

व्हॅनगररी(न्यूझीलंड)  – पावसाने पाचव्या दिवशी दमदार हजेरी लावल्याने भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अ यांच्यातील तिसरा अनधिकृत कसोटी सामना अखेर अनिर्णीत राहिला. पावसामुळे अखेरच्या दिवशी एका चेंडूचाही खेळ झाली नाही. त्यामुळे पंचांनी सामना अनिर्णीत घोषीत केला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने देखील बरोबरीत सुटल्याने या मालिकेतील पारितोषिक विभागून देण्यात आले.

पहिल्या डावात भारताने केलेल्या 323 धावांचा पाठलाग करणाऱ्या न्युझिलंड अ संघाच्या कॅम फ्लॅचरने 103 धावा करत कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारताना न्यूझीलंड अ संघाला 75 धावांची आघाडी मिळवून दिली. यावेळी त्याने तळातील फलंदाजासह उपयुक्त भागीदाऱ्या करत न्यूझीलंड अ संघाला भारत अ च्या धावसंख्येच्या पुढे मजल मारून दिली.

त्यात तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज टिम सिफर्टच्या 86 धावांचा देखील मोठा वाटा होता. यावेळी चौथ्या दिवसाचा खेळ भारतीय फिरकी गोलंदाज कृष्णप्पा गौतमने गाजवला. त्याच्या 139 धावांत 6 बळीच्या कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंड अ संघाला 400 धावांच्या आत रोखण्यात भारत अ संघाला यश मिळाले.

यावेळी न्यूझीलंड अ संघाला आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 398 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात फलंदाजी करण्यास उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. अभिमन्यू ईश्वरन 2 धावा करून लवकर बाद झाल्याने भारतीय संघ पेचात पडला होता. परंतु, त्यानंतर आर. समर्थ आणि अंकीत बावणे यांनी भारताचा डाव सावरत आणखी पडझड होणार नाही याकडे लक्ष देत चौथ्या दिवसाखेर भारताला 38 धावांपर्यंत मजल मारून दिली.

पाचव्या दिवशीचा पूर्ण खेळ पावसाने धुतला गेल्याने हा सामना आणि मालिका बरोबरीत सुटली. भारत अ संघ 7 डिसेंबरपासून न्यूझीलंड अ विरुद्ध तीन अनधिकृत एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)