पाक व्याप्त काश्‍मीरमधील शारदा मंदिरासाठी स्वतंत्र कोरिडोरला मंजूरी 

इस्लामाबाद – पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमधील शारदा पीठ या पुरातन हिंदू मंदिराला हिंदू भाविकांना भेट देणे सोयीचे व्हावे यासाठी स्वतंत्र कोरिडोर करण्याच्या प्रस्तावाला पाकिस्तानने मंजूरी दिली आहे. शारदा पीठ कोरिडोर खुला झाल्यास कर्तारपूर कोरिडोरनंतर भाविकांसाठी खुला होणारा तो पाकिस्तानातील दुसरा कोरिडोर असणार आहे. शारदा पीठ कोरिडोरबाबत भारताने यापूर्वीच पाकिस्तानला प्रस्ताव पाठवला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांकडून याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

या कोरिडोरच्या ठिकाणांना अधिकाऱ्यांचे पथक भेट देईल. त्यानंतर त्याबाबतचा अहवाल पंतप्रधानांना पाठवला जाईल, असे या सूत्रांनी म्हटले आहे. या कोरिडोरच्या विकासाबाबत विचारले असता यापूर्वी दोन्ही देशांदरम्यानच्या सर्वंकष चर्चेदरम्यान बऱ्याच वेळेस भारताकडून याबाबत पाकिस्तानला विनंती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

शारदा पीठाची स्थापना ख्रिस्तपूर्व 237 मध्ये सम्राट अशोकाच्या कालावधीमध्ये झाली होती. 5000 हजार वर्षांपूर्वीचे शारदा पीठ सर्वात पुरातन असूनही सर्वात दुर्लक्षित राहिले आहे. शारदा पीठ हे भारतीय उपखंडातील सर्वात पुरातन धार्मिक विद्यापिठ होते. काश्‍मीरी पंडीतांसाठी तीन सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थस्थानांपैकी ते एक आहे. अनंतनाग येथील मार्तंड सूर्य मंदिर आणि अमरनाथ मंदिर ही अन्य दोन पवित्र देवस्थाने आहेत. काश्‍मीरी पंडीतांकडून अनेक वर्षांपासून शारदा पीठासाठी कोरिडोरची मागणी केली गेली आहे. त्याचा विचार करून चालू वर्षातच हा कोरिडोर खुला केला जाईल, असे पाकिस्तान तेहरीक ए इन्साफचे विधानसभेतील सदस्य रमेश कुमार यांनी सांगितले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील कर्तारपूर कोरिडोर पाकिस्तानने खुला केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)