इंदापूर पाणीप्रश्न : न्यायालयाचे दार ठोठावू- आमदार भरणे

निमसाखर – नीरा डावा कालव्यातून 47 ते 59 या उपकालव्यातून यापुढे पुरेसे पाणी मिळणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. नीरा उजव्या कालव्याकडे 13 टीएमसी पाणी वळविले जाणार असल्याच्या वृत्ताने शेतकरी चिंतेत आहेत. सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला असला तरी आपण या निर्णयाशी सहमत नसून या निर्णयावर न्यायालयात किंवा हरितलवादाकडे दाद मागणार आहे. यासाठीची 90 टक्के कागदपत्रांची पुर्तता झाली असल्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले.

निमसाखर (ता. इंदापूर) येथे पत्रकारांशी बोलताना आमदार भरणे म्हणाले की, भाटघर धरणातील पाणी वाटपाच्या वेळी काही तांत्रिक गोष्टीकडे लक्ष दिले गेलेले नाही. नीरा डावा कालव्यातून 47 टक्के आणि नीरा उजव्या कालव्यातून 53 टक्के पाणी देण्याचे धोरण तत्कालीन सरकारने निश्‍चित केले. मात्र, नीरादेवधर धरणातंर्गत कालव्याची कामे अपूर्ण होती म्हणून 16 टक्के पाणी नीरा डावा कालव्यातून बारामती व इंदापुरला मिळाले. यामुळे आपल्या भागातील जमीन ओलिताखाली आली. मात्र, तो पाणी वाटपाचा करार 2017ला संपल्यामुळे नीरा उजव्या कालव्याकडील शेतकऱ्यांनी विशेषतः खासदार निंबाळकर आणि मोहिते पाटील यांनी सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडले. सरकारने नीरा डावा कालव्यातून ओलीताखाली येणाऱ्या बारामती आणि इंदापुरातील शेतकऱ्यांना विचारात न घेता थेट आदेश दिले आहेत. यामुळे इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. न्यायालयातील हक्क मागणी बरोबरच वेळ पडल्यास तीव्र आंदोलनाचाही पर्याय खुला ठेवला आहे, असेही आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.