कमिन्सने लांबणीवर टाकला भारताचा विजय

दिवसअखेर ऑस्ट्रेलिया 8 बाद 258 धावांची मजल; पॅट कमिन्सची एकाकी लढत

मेलबर्न – पॅट कमिन्सने दिवस अखेरपर्यंत केलेल्या चिवट आणि झुंजार खेळीमुळे विजयापासून अवघे दोन पावले दुर असलेल्या भारतीय संघाला पाचव्या दिवशी पुन्हा मैदानावर उतरावे लागणार असून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अद्याप 141 धावांची गरज असून चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा त्यांच्या 8 बाद 258 धावा झालेल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मेलबर्न कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने आपला दुसरा डाव 5 बाद 54 धावांपासून खेळण्यास सुरुवात केली. भारताने आपल्या कालच्या धावसंख्येत 52 धावांची भर घातली. यावेळी भारताकडून सलमीवीर मयांक अग्रवालने 42 तर पंतने 33 धावा केल्या. त्यामुळे दुसऱ्या डावातील 108 धावा आणि पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

भारताने दिलेल्या 399 धावांचा पाठलाग ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात बुमराहने ऍरोन फिंचला 6 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर जडेजाने दुसरा सलामीवीर मार्कस हॅरिसला 13 धावांवर असताना बाद करत दुसरा धक्‍का दिला. त्यामुळे लंचसाठी खेळ थांबवण्यात आला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 44 अशी अवस्था झाली होती.

लंचनंतर ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्शने सावध फलंदाजी करताना भागिदारी रचण्यास सुरुवात केली. परंतु या जोडीला मोठी भागिदारी रचण्यात अपयश आले. चांगली फलंदाजी करणाऱ्या उस्मान ख्वाजाला 33 धावांवर असताना शमीने पायचीत केले आणि ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या ट्रॅव्हिस हेडच्या साथीने शॉन मार्शने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, बुमराहने अर्धशतकाकडे वाटचाल करत असलेल्या शॉन मार्शला 44 धावांवर असताना बाद केले. आणि ऑस्ट्रेलियाची 4 बाद 114 अशी अवस्था केली. त्यानंतर आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांचा फारसा प्रतिकार करता आला नाही. यानंतर, उपकर्णधार मिचेल मार्शदेखिल जास्त चमक दाखवू शकला नाही जडेजाने त्याला बाद करत ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्‍का दिला.

तर, मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या ट्रॅविस हेडने सावध खेळ करायला सुरूवात करत कर्णधार टिम पेनच्या साथीत डाव सावरायचा प्रयत्न केला. मात्र, हेड 34 धावांवर असताना इशांत शर्माने त्याला बाद करत ऑस्ट्रेलियाला सहावा धक्‍का दिल्यानंतर थोड्यच वेळात रविंद्र जडेजाने कर्णधार टिम पेनला 26 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला सातवा धक्‍का दिला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची 7 बाद 176 अशी अवस्था झाली होती.

त्यानंतर 70 व्या षटकात शमीने स्टार्कचा त्रिफळा उडवत ऑस्ट्रेलियाला आठवा धक्‍का देत भारताचा विजय दृष्टिपथात आणला. दोनच विकेट राहिल्याने भारताला अर्धा तास वाढवून मिळाला होता. आता भारत चौथ्या दिवशीच सामना जिंकणार असे वाटत असतानाच पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरत एकहाती किल्ला लढवत ठेवला. त्यामुळे भारताला पाचव्या दिवशी पुन्हा मैदानात उतरावे लागणार आहे.

चौथ्या दिवस अखेर पॅट कमिन्स 103 चेंडूत 61 धावा करत नाबाद राहिला आहे. त्याला लायनने 38 चेंडू खेळून 6 धावा करत चांगली साथ दिली. हवामन खात्याच्या अंदाजानुसार उद्या मेलबर्नमध्ये पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. आजच अखेरची षटके टाकत असताना आभाळ भरून आले होते. त्यामुळे उद्या काय होणार याची चिंता टीम इंडियासह चाहत्यांना लागली आहे.

संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव 169.4 षटकांत 7 बाद 443 घोषित (चेतेश्‍वर पुजारा 106, विराट कोहली 82, मयंक अग्रवाल 76, रोहित शर्मा नाबाद 63, पॅट कमिन्स 72-3), ऑस्ट्रेलिया पहिला डाव 66.5 षटकांत सर्वबाद 151 (टिम पेन 22, मार्कस हॅरिस 22, जसप्रीत बुमराह 33-6, रविंद्र जडेजा 45-2, मोहम्मद शमी 27-1), भारत दुसरा डाव 37.3 षटकांत 8 बाद 106 घोषित (मयंक अग्रवाल 42, हनुमा विहारी 13, ऋषभ पंत 33, पॅट कमिन्स 27-6, जोश हेझलवूड 22-2). ऑस्ट्रेलिया 85 षटकांत 8 बाद 258 (पॅट कमिन्स नाबाद 61, शॉन मार्श 44, उस्मान ख्वाजा 33, रविंद्र जडेजा 82-3, जसप्रीत बुमराह 53-2, मोहम्माद शमी 71-2).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)