नवी दिल्ली: भारतात देखील आता बाहेरून खाद्यपदार्थ मागविण्याचा कल वाढत चालला आहे. एका सर्वेक्षणानुसार शहरात राहणारे कुटुंब आता घरात स्वयंपाक करण्याऐवजी स्विगी, उबर ईट आणि झोमॅटो यासारख्या फूड डिलिव्हरी ऍप्सचा वापर करत आहे. ऑर्डर करून खाद्यपदार्थ मागविणाऱ्यांमध्ये घरातील महिलेचा वाटा अधिक असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे.
भारतातील लोक महिन्यात सरासरी 2500 रुपये बाहेरच्या खाण्यावर खर्च करत आहेत. याकरता ते महिन्यातून 7 वेळा रेस्टॉरंट किंवा कॅफेला भेट देतात किंवा ऑर्डर करून खाद्यपदार्थ मागवत आहेत. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाकडून 24 शहरांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
online food बाहेरील खाद्यपदार्थांसाठी आता घराबाहेर पडण्याची गरज नाही. स्विगी आणि झोमॅटो यासारखे ऍप खाद्यपदार्थ घरापर्यंत पोहोचवितात. झोमॅटोने महिन्याला 2 कोटी 10 लाख ऑर्डर्स मिळाल्याचा दावा केला आहे. तर दर महिन्याला स्विगीला 2 कोटी ऑर्डर्स मिळत आहेत.