गृहकर्जासाठी पात्रता वाढविताना…

स्वत:चे घर असण्याची भावना मनात असणे स्वाभाविक आहे. यादृष्टीने प्रत्येक कुटुंब प्रयत्नशील असते. शहरात, महानगरात घर खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. सामान्य कुटुंबासाठी तीस ते चाळीस लाख रुपये जमवणे ही अशक्‍यप्राय गोष्ट मानली जाते. सरकारकडून कितीही सवलत दिली जात असली तरी आरोग्य, शिक्षणावरील वाढते खर्च लक्षात घेता घर खरेदीसाठी वेगळा पैसा काढून ठेवणे कठीण आहे. मात्र, बॅंकांच्या सहकार्यातून गृहकर्जाच्या आधारे घर खरेदी सोपी झाली आहे. काही महिन्यांपासून गृहकर्जाच्या व्याजदरात घट झाल्याने गृहकर्ज तुलनेने स्वस्त झाले आहेत. पती-पत्नी नोकरदार असतील तर गृहकर्ज मिळण्यास फारशा अडचणी येत नाही. उत्पन्न, सांपत्तिक स्थिती, अर्जदाराचे वय, सिबिल स्कोर यावर गृहकर्जाची पात्रता अवलंबून असते. यातील एकाही गोष्टीत उणीव राहिल्यास गृहकर्ज मिळण्यास अडचण येते. त्यामुळे कमी व्याजदरात अधिक गृहकर्ज मिळवण्यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

आपल्या क्षमतेनुसार गृहकर्जाची रक्कम आणि कालावधी निश्‍चित होतो. उत्पन्न पाहूनच अर्जदारासाठी कर्जाचा कालावधी ठेवायचा, यावर बॅंक विचार करते. यानुसार दीर्घकाळासाठी आपण अधिक गृहकर्जाची मागणी करू शकतो. त्यामुळे सक्षम अर्जदारांना बॅंका दीर्घकाळासाठी मोठी रक्कम देण्यास सज्ज असतात. जर वेळेवर हप्ते भरल्यास टॉपअप करण्याची सुविधाही बॅंक देते.

सध्याचे सुरू असलेले कर्ज लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करा. पर्सनल लोन, कार लोन आणि होम लोन सुरू असतील तर लहान कर्ज तातडीने फेडून टाका. अशी कृती न केल्यास आपण कर्जाच्या जाळ्यात अडकू शकतो. लहानसहान गोष्टीसाठी कर्ज घेण्याचा मोह टाळा. याचा परिणाम मोठे कर्ज घेताना येतो. जर आपले उत्पन्न बॅंकेच्या दृष्टीने समाधानकारक नसेल तर कर्जाचे प्रमाण कमी राहते आणि त्याचा व्याजदरही अधिक राहतो. घराच्या किमतीच्या तुलनेत कर्जाची रक्कम कमी राहिल्यास घराचे स्वप्न साकारण्यास अडचणी येतात. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी प्रयत्नशील राहून संभाव्य अडचणी दूर करा.

क्रेडिट स्कोरवर कर्ज मिळणे आणि न मिळणे अवलंबून असते. त्यामुळे क्रेडिट स्कोर चांगला राहण्याबाबत दक्ष राहा. क्रेडिट कार्डचे पेमेंट नियमित करणे, धनादेश बाऊन्स होणार नाही, याची काळजी घेणे, अवांतर कर्ज न घेणे या कृतीतून क्रेडिट स्कोर चांगला राहतो. पर्सनल, गोल्ड लोन लवकर फेडले तर त्याचा सकारात्मक परिणाम होतो.

कर्जासाठी अर्ज करताना अतिरिक्त उत्पन्नाचा आधार घ्यावा. पती/पत्नी नोकरदार असेल तर दोघांचे उत्पन्न दाखवावे, मुदत ठेवी, सोने, जमीन आदी मालमत्ता असेल तर त्याचा उल्लेख करून कर्जाची रक्कम वाढवू शकता. आपल्या सांपत्तिक स्थिती आणि उत्पन्नावरून बॅंका अधिक कर्ज देण्यास राजी होतात. तसेच मनाप्रमाणे कालावधी निवडता येतो.

जर एखाद्या बॅंकेकडून भविष्यात कर्ज घ्यायचे असेल आणि तेथे आपले खाते नसेल तर तेथे दोघांच्या नावाने खाते सुरू करा. संबंधित खात्यावरून आर्थिक व्यवहार वाढवा. बॅंक अधिकारी, कर्मचाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. कालांतराने सहा महिने किंवा वर्षभरानंतर कर्जासाठी अर्ज केल्यास बॅंकेकडून निश्‍चितच सकारात्मक प्रतिसाद मिळतो. यादरम्यान कर्जाशी निगडित गोष्टीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करत राहा. गृहकर्जामुळे नोकरदार पती-पत्नींना करसवलत मिळते. त्यामुळे बहुतांश नोकरदार मंडळी गृहकर्जाबाबत आग्रही असतात. नियमित पेमेंट करून करसवलतीचा आणि क्रेडिट स्कोर सुधारण्याचा फायदा पदरात पाडून घेऊ शकतो. भविष्यात अन्य मालमत्ता खरेदी करताना कर्ज मिळण्यास कोणत्याच तांत्रिक अडचणी येत नाही.

– आशिष जोशी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)