प्रियांका गांधी यांच्याकडे सुत्रे सोपवण्याची कॉंग्रेसमधून वाढती मागणी

नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांची जागा कोण घेणार याविषयीचा सस्पेन्स कायम आहे. अशातच राहुल यांच्या भगिनी प्रियांका गांधी-वढेरा यांच्याकडे सुत्रे सोपवण्याची मागणी पक्षात वाढीस लागली आहे.

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी प्रियांका यांच्या नावाला अनुकूलता दर्शवली आहे. त्यामध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र आणि माजी खासदार अभिजीत मुखर्जी यांचाही समावेश आहे. प्रियांका यांनी कॉंग्रेसचे नेतृत्व स्वीकारावे अशी भावना देशभरातील पक्ष कार्यकर्त्यांची आहे. त्या भावनेकडे प्रियांका यांनी दुर्लक्ष करू नये. कॉंग्रेसपुढे सध्या अस्तित्वाचाच पेच उभा राहिला आहे. अशा स्थितीत प्रियांका यांनी अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारून पक्षाचे भवितव्य उज्वल बनवावे. प्रियांका त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे पक्षाला अभूतपूर्व यश मिळवून देऊ शकतात, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

तर सध्याच्या काळात कॉंग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी प्रियांका याच सर्वोत्तम व्यक्ती असल्याची भावना माजी केंद्रीय मंत्री अनिल शास्त्री यांनी व्यक्त केली. राहुल राजीनाम्यावर ठाम असल्याने लवकरात लवकर पक्षाध्यक्ष निवडण्याची गरज आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. आणखी एक माजी केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी प्रियांका यांनी नेतृत्व स्वीकारण्याची हीच योग्य वेळ असल्याचे म्हटले. तर प्रियांका यांनी अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते करत असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते भक्तचरण दास यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)