वाहन क्षेत्रात दरयुद्ध वाढणार

बीएस-4 वाहनांचा साठा कंपन्या बाजारात आणणार

नवी दिल्ली – केंद्र सरकारने एप्रिल 2020 पासून बीएस 4 उत्सर्जन मानांकनाची वाहने विकण्यास प्रतिबंध घातलेला आहे. त्यानंतर बीएस 6 या उत्सर्जन मानांकनाची वाहने देशात विकली जाणार आहेत. त्यामुळे ज्या कंपन्यांकडे बीएस 4 या वाहनांचा अधिक साठा असेल त्या कंपन्या ही वाहने पुढील सात- आठ महिन्यांच्या काळात जास्तीत जास्त प्रमाणात विकण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे या वाहनांच्या दरात घट करण्याची स्पर्धा निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

बजाज ऑटोच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, बजाज ऑटो कंपनीने बीएस -6 वाहनांची तयारी पूर्ण केली आहे. या कंपनीची वाहने 1 एप्रिल 2020 च्या अगोदरच बीएस- 6 पद्धतीनुसार तयार करण्यात येतील. मात्र इतर कंपन्या याबाबत तयार आहेत का हे समजणे अवघड आहे. अनेक कंपन्यांकडे बीएस- 4 पद्धतीच्या जुन्या वाहनांचा मोठा साठा असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या कंपन्या एप्रिल 2020 च्या अगोदर हा साठा बाजारपेठेत आक्रमकरीत्या विकण्याचा प्रयत्न करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे दरयुद्ध निर्माण होऊ शकते.

आगामी काळातील नवे उत्सर्जन मानदंड, त्यानंतर इलेक्‍ट्रिक वाहन या कारणांमुळे वाहन बाजारपेठेत बरीच संदिग्धता निर्माण होण्याची शक्‍यता आहे. मात्र, बजाज ऑटो या परिस्थितीतून मार्ग काढू शकेल असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीचा निर्यात पेठेत मोठा हिस्सा असल्यामुळे कंपनीच्या महसुलावर फारसा परिणाम होणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. तीनचाकी वाहनात कंपनीचा बाजारपेठेत मोठा हिस्सा आहे त्यामुळे कंपनीवर आगामी काळात फारसा परिणाम होणार नाही असे कंपनीने म्हटले आहे. मात्र, कंपनीचे बदलणाऱ्या परिस्थितीकडे बारीक लक्ष असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.