दि. 1 सप्टेंबरपासून करवाढ लागू करण्याचा प्रशासनाचा विचार
पुणे – कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत प्रवेश करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या वाहन प्रवेश करात वाढ करण्यासाठी बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. येत्या दि. 1 सप्टेंबरपासून ही करवाढ लागू करण्याचा विचार असून, लवकरच यासंदर्भातील प्रक्रिया सुरू करणाच्या निर्णय बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. कॅन्टोन्मेंट कायद्यानुसार, दर पाच वर्षांनी वाहन करात बदल करण्याचा अधिकार बोर्ड प्रशासनाकडे आहे. त्यानुसार बोर्डाने सुमारे सहा महिन्यांपूर्वी करवाढीचा प्रस्ताव मांडला होता.
यावर जाहीर नोटीस काढून हरकती आणि सूचनादेखील मागविण्यात आल्या होत्या. यावर काही हरकती आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात सुनावणीसाठी कोणीही उपस्थित राहिले नाही. त्यानंतर बोर्डाने करवाढीचा प्रस्ताव प्रधान कार्यालयाकडे पाठविला होता. तेथेदेखील ही करवाढ मंजूर करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले.
बोर्डाने यापूर्वी 2013 साली वाहन प्रवेश करात वाढ केली होती. ही वाढ सुमारे 60 ते 100 टक्के आहे. सध्याच्या दरानुसार बोर्डाला सुमारे 10.5 कोटी इतका उत्पन्न मिळत असून, वाढीव दारानुसार हे उत्पन्न सुमारे 15 कोटीपर्यंत वाढणार असल्याचे बोर्ड प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.