वाराणसीमध्ये सपाकडून लष्करातील बडतर्फ सैनिकाला उमेदवारी

लखनौ – तेज बहादूर यादव या सीमा सुरक्षा दलातील बडतर्फ शिपायाला समाजवादी पार्टीकडून वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी वाराणसीमधून शालिनी यादव यांना सपाकडून तर कॉंग्रेसकडून अजय राय यांना वाराणसीच्या जागेसाठी उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आता समाजवादी पार्टीने वाराणसीतून उमेदवार बदलला आहे. समाजवादी पार्टीने, बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रीय लोकदलाबरोबर निवडणूक आघाडी केली आहे.

भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला म्हणून आपल्याला बीएसएफमधून बडतर्फ केले गेले. सुरक्षा दलांमधील भ्रष्टाचार संपवणे आणि दलांचे सक्षमीकरण करणे हा आपला एकमेव उद्देश आहे, असे यादव याने पत्रकारांशी बोलताना सांगितले. “बीएसएफ’च्या जवानांसाठी देण्यात येणाऱ्या अन्नाच्या दर्जाविषयी यादव याने 2017 साली सोशल मिडीयावर वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केले होते. “लाईन ऑफ कंट्रोल’वर आणि जम्मू काश्‍मीरमध्ये बर्फाळ आणि डोंगराळ भागात तैनात असलेल्या सैनिकांना सुमार अन्न दिले जात असल्याचे त्याने त्याने या व्हिडीओत म्हटले होते. त्यावरून यादव याला शिस्तभंगाची कारवाई म्हणून कामावरून कमी केले गेले होते.

वाराणसीमध्ये लोकसभा निवडणूकीच्या सातव्या टप्प्यात 19 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आज (दि. 29) रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)