दुचाकी रिपेरिंगमध्ये हात काळे करूनच आयुष्यरूपी जीवनात रंग भरले

संघर्षकथा… (गुरूनाथ जाधव )

परिस्थितीनं व्यवसायाचा शोध घ्यायला शिकवलं. वडीलांचे छत्र हरवलं चार भावंडाची आणि घरची सर्व जबाबदारी स्विकारावी लागली. दुचाकी रिपेरिंग च्या व्यवसायात हात काळे करूनच आयुष्यरूपी जीवनात रंग भरले. ही संघर्ष कथा आहे पटवर्धन ऑटोमोबाईल व पीयूसी सेंटरचे संचालक व साताराचे रहिवासी असलेल्या माधव श्रीधर पटवर्धन यांची.

ऑटोमोबाईल इंजिनिअरींगचा डिप्लोमा पूर्ण करून सातारामध्ये 1 मार्च 1972 रोजी दुचाकी वाहने रिपेरिंग करण्याचे पहिले दुकान सुरू केले. वडिलांनी दिल्या पाचशे रूपयाच्या भांडवलावरती. त्यावेळी शहरात 25 ते 30 दुचाकी वाहनेच होती. लॅम्ब्रेटा स्कुटर, व बजाज 150 बाजारात नुकत्याच दाखल झाल्या होत्या. स्कुटर रिपेंअरींग बाबत नागरिकांना कसलीच माहिती नव्हती. याच्या सोबत पुणे, मुंबई, नाशीक येथील डिलर कडून दुचाकी गाडया खरेदी करून सातारामध्ये आणून देण्याचे काम केले. त्यातून शंभर रूपये सुटायचे. रिपेअरिंगचे पार्ट सातारामध्ये उपलब्ध नसत त्यामुळे सतत पुण्याला जावे लागायचे. यातुन सातारामध्ये रिपेअरिंग स्पेअर पार्टच्या दुकानाची देखील सुरूवात केली.

डिप्लोमा झालेला मुलगा रसत्यावरती गाड्या धुण्याचे काम करतोय, याची काळजी आई कुसुम हिला कायम वाटत असायची मात्र कष्टाने रिपेरिंगच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून दिल्याने तिला कायमच अभिमान वाटत राहिला. याला कोण मुलगी देणार असे पाहुण्यामध्ये बोलले जायचे. मात्र माधव पटवर्धन यांची पत्नी संजीवनीने आयुष्यात खुप मोलाची साथ त्यांना दिली. सासरे कृष्णाजी व दादा पोतनीस यांनी वर्कशॉप मध्ये माधव याचे काम पाहिले असल्याने त्यानी लग्नासाठी तात्काळ सहमती दिली. आपण खुप शिकलो नाही मात्र मुलांना चांगले शिक्षण दयायचे दोघांनी ठरवले होते. माधव पटवर्धन यांना दोन मुली व एक मुलगा त्यामधील मोठी मुलगी डॉ. भक्ती दंतचिकित्सक आहे., तर डॉ. भावना भारती विद्यापीठात मेडिकल आफिसर आहे व मुलगा भुषण त्याचे शिक्षण बीटेक इन टोमोबाईल झाले असून तो त्याचा स्वतंत्र व्यवसाय करत आहे. त्याची नियोजित वधु प्राची देशमुख शिंदे बी कॉम एल एल बी आहे.

1993 साली संपूर्ण महाराष्ट्रातून पहील्यांदा पीयुसी करणारी मोबाईल गाडी सातारा मध्ये माधव पटवर्धन यांनी आणली. व सरकारी धोरणाप्रमाणे वाहनांची पीयूसी करणारे केंद्र सुरू केले. आता रिप्लेसमेंट त्वरीत आहे पण त्यावेळी रिपेंरिंग मध्येच कसरत करावी लागायची. फॉल्ट फाईंडिंगचे कौशल्य कष्टाने साध्य करावे लागले. पैशापेक्षा माणसं आयुष्यात जास्त कमवली याचे समाधान आहे.

स्वत:च्या कोणत्याही व्यवसायामध्ये पोटापूरते खावून पिवून सुखी राहून जगण्याची खात्री आहे. विविध देशात फिरणारे माधव पटवर्धन यांनी रोटरी क्‍लबचे अध्यक्ष पद देखील भुषवले. माउथ ऑरगन,बुलबूल वाजवणे या सारखे छंद ते आज देखील जोपासत आहेत. कायमच विनोदी व मार्मीक कथा ते आजही सांगत असतात. विविध प्रकारच्या मशींनच्या साह्याने सर्व प्रकारच्या वाहनांच्या, कुलपांच्या किल्ल्या बनविण्याचे काम आज सातारामध्ये पटवर्धन ऑटोमोबाईच्या वतीने केले जाते आहे. यामध्ये सेन्सर, रिमोट सर्वच प्रकारच्या किल्ल्या बनविन्याचा त्यांचा हातखंडा आहे. सातारावासीयांनी भरभरून दिले माणसांनी आपली किंमत माहित करून दिली. मित्रांची संपत्ती हेच आपल्या जगण्याचे बळ आहे असे पटवर्धन अभिमानाने सांगतात. आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटीच्या जोरावर काहीही साध्य करता येवू शकते असे ते सांगतात. शत्रु निर्माणच करायचे नाहीत. व मित्रांची संपत्ती जमवणे हे व्यवसायी यशाचे मुख्य कारण आहे असे ते मानतात. तरूणांनी कायमच व्यवसायाची कास धरावी. लोकांच्या गरजांचा शोध घ्यावा व त्यादृष्टीने मेहनत करावी यश तुमचेच आहे असे माधव पटवर्धन सांगतात.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)