२३ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत आज भारत ताजिकिस्तान आमनेसामने

ताशकंद : भारत आणि ताजिकिस्तान आज २३ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. २३ वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघाला पहिल्याच सामन्यामध्ये गतविजेत्या उझबेकिस्तानकडून ०-३ असा पराभव स्वीकारावा लागल्याने एफ गटातील आपला हा दुसरा सामना जिंकणे अनिवार्य झाले आहे. एफ गटामध्ये उझबेकिस्तान, भारत आणि ताजिकिस्तान हे तीनच संघ असल्याने अंतिम सामन्यांमध्ये आपली जागा बनविण्यासाठी श्रुंखलेतील प्रत्येक सामना तितकाच महत्वाचा मनाला जात आहे.

याबाबत बोलताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक डेरिक पेरेरा यांनी सांगितले की, “ताजिकिस्तानविरुद्धचा सामना भारतीय संघासाठी खूपच महत्वाचा ठरणार असून हा सामना जिंकण्यासाठी आम्ही सर्वोतपरी प्रयत्न करू.” उझबेकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला पत्कराव्या लागलेल्या पराभवाबाबत देखील परेरा यांनी यावेळी वक्तव्य केले. ते म्हणाले की, “उझबेकिस्तानच्या संघाचा खेळ आमच्या संघापेक्षा सरस होता, आम्हाला देखील सामन्याच्या पूर्वार्धात गोल करण्याच्या दोन संधी मिळाल्या होत्या मात्र संघाकडून त्या दवडण्यात आल्या. ते दोन गोल करण्यात आम्ही यशस्वी झालो असतो तर सामन्याचा निकाल कदाचित वेगळा असता.”

२३ वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार विनीत राय याने आपल्या संघाकडे अजूनही पुनरागमन करण्याची संधी असल्याचा विश्वास दर्शविताना सांगितले की, “आम्ही उझबेकिस्तानविरोधात खेळताना अनेक चुका केल्या आणि त्यामुळेच आम्हाला पहिला सामना गमवावा लागला होता परंतु आता आम्ही ताजिकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरू. आम्ही आमचा उत्कृष्ट खेळ सादर करून या सामन्यामध्ये विजय मिळविण्याचा प्रयत्न करू.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)