वृक्षलागवडीत पुणे “लो प्रोग्रेस झोन’मध्ये

पुणे – वनमहोत्सवांतर्गत वृक्षलागवडीसाठी राज्यात विविध ठिकाणी लगबग सुरू आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये वृक्ष लागवडीची कामे जोमाने सुरू आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांनी पहिल्याच आठवड्यात दिलेल्या उद्दिष्टाच्या 30 टक्‍के वृक्ष लागवड पूर्ण केली असल्याची नोंद वनविभागाने केली आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात अद्यापही वृक्ष लागवडीची गती अतिशय कमी असल्याची देखील नोंद करण्यात आली आहे.

राज्यात 1 जुुलैपासून वनमहोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या उपक्रमांतर्गत वृक्ष लागवडीसाठी नागरिक सरसावले आहेत. दररोज विविध ठिकाणी वृक्षारोपण केले जात आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत वृक्षारोपण करण्याचे आवाहनही केले जात आहे. पुण्यातही अनेक ठिकाणी नागरिक रोपांची लागवड करत आहेत. मात्र, उद्दिष्टाच्या तुलनेत त्याचेप्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळेच वृक्ष लागवडीबाबत पुणे अद्याप “लो प्रोग्रेस झोन’मध्ये आहे. तर दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये वृक्ष लागवडीचे काम झपाट्याने होत आहे. यामध्ये कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. या तिन्ही जिल्ह्यांनी दिलेल्या उद्दिष्टाच्या 30 टक्‍के लागवड पूर्ण केली असून उद्दिष्टपूर्तीकडे वेगाने वाटचाल करीत आहेत.

कमी पावसाचा परिणाम
वृक्ष लागवडीसाठी पाऊस हा एक महत्त्वाचा घटक आहे. अनेक ठिकाणी अद्यापही पाऊस पडलेला नाही. पुण्यातही दौंड, इंदापूर, बारामती या तालुक्‍यांमध्ये पावसाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळेच वृक्ष लागवडीच्या कामांना आवश्‍यक गती मिळालेली नाही. विशेषत: मराठवाड्यात अद्यापही पाऊस न पडल्याने वृक्ष लागवडीच्या कामांना सुरुवात झालेली नाही. आगामी काळात चांगला पाऊस पडल्यास वृक्ष लागवडीच्या कामांना निश्‍चितच गती मिळेल, अशी अपेक्षा वनविभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here