वाई शहरातील मैला ओढ्यातून शेतांमध्ये

विहिरींचे पाणीही बनले दूषित : पालिका प्रशासनाने तातडीने उपाय योजना करण्याची नागरिकांची मागणी

मेणवली –
वाई एमआयडीसीतील नगरपालिकेच्या कचरा डेपोत ओतण्यात येणारा मैला लगतच्या ओढ्यातून शेतात वाहून जात आहे. यामुळे परिसरात दुर्गधी पसरण्याबरोबरच विहिरींचे पाणी दूषित होवून शेतीच्या व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरू लागले आहे. नगरपालिका प्रशासनाने मैला व्यवस्थापन प्रकल्पाची तत्काळ सोय लावण्याची मागणी रहिवाशी व शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

वाई नगरपालिका प्रशासनाच्या व पदाधिकऱ्यांच्या कारभाराने कायमच चर्चेचा विषय ठरलेल्या एमआयडीसी मधील नगरपालिकेच्या कचरा डेपोला अनेक समस्यांनी घेरले आहे. डेपोतील ओल्या सुक्‍या कचऱ्याचे व मैला प्रकल्पाचे कागदोपत्रीच व्यवस्थापन होत असून केवळ आर्थिक उलाढालीसाठी प्रकल्प तयार केले जात असल्याचे बोलले जात आहे. वाई शहरातील सार्वजनिक शौचालयातून टाकीत जमा होणाऱ्या रोजच्या मैल्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी एमआयडीसी कचरा डेपोत नव्याने मैला व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

शहरातील विविध ठिकाणी मैला संकलन केलेल्या टाकीतील मैला ड्रममध्ये जमा करून कचरा डेपोतील मैला व्यवस्थापन प्रकल्पात कित्येक ड्रम ओतला जातो. जमा झालेल्या मैलावर प्रक्रिया होवून फिल्टरद्वारे चांगल्या पाण्याचा निचरा बाहेर सोडला जातो, असे नगरपालिकेने प्रशस्तीपत्र मिळवले आहे. परंतु मैल्यासकट पाणी प्रकल्पातून बाहेर पडत असल्याचा विसर वाई नगरपालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांना पडला असल्याचे चित्र कचरा डेपोत पहायला मिळत आहे. शहरातून रोज जमा केलेले मैल्याचे कित्येक ड्रम मैला प्रकल्पात ओतल्यावर त्यावर होणारी फिल्टर प्रक्रिया नगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ व दुर्लक्षित कारभारामुळे मैला प्रकल्प कुचकामी ठरला आहे.

या मैला प्रकल्पात टाकण्यात येणारा मैला योग्य प्रकारे फिल्टरने शुद्ध केला जात नसल्यामुळे पाणीमिश्रीत मैला जशाचा तसा लगतच्या ओढ्यात वाहून जात असल्याने परिसरात दुर्गधीचे साम्राज्य पसरून शेतात काम करणे अवघड झाले आहे. लगतच्या विहिरीत मैला मिश्रीत पाणी मुरल्याने विहिरींचे पाणी दूषित होवून आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अगोदरच कचरा डेपोतील घाणीमुळे हैराण झालेला येथील रहिवाशी मैला प्रकल्पाच्या गचाळ कारभाराने संतापला आहे. वाई नगरपालिका प्रशासनाने कचरा डेपोतील कामात सुधारणा न केल्यास कचऱ्याची एकही गाडी डेपोत खाली करू देणार नाही, असा इशारा दिल्यावर तात्पुरता मैला थांबवला असला तरी भविष्यात योग्य काळजी घेवून येथील रहिवाशी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)