देहूरोडकर दहशतीच्या छायेत

देहुरोड – देहुरोड परिसरात गुंडांचा हैदोस वाढत असून, देहूरोडकर दहशतीखाली आहेत. पोलीस ठाण्यात असणारे अपुरे वाहने व मनुष्यबळामुळे गुंडांवर कारवाई करण्यास विलंब होत आहे. गुंडांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, दहशत मुक्‍त देहुरोड करावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देहुरोड विकास समितीने निवेदनाद्वारे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाचे आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांना दिले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्‍तालयाचा पहिले आयुक्‍त म्हणून आर. के. पद्मनाभन यांना मान मिळाला. मात्र अपुरे मनुष्यबळ, कमी वाहने, साहित्य आदी बाबी कमी असल्याने आयुक्‍तालयाचा कारभार अद्यापही सुस्थितीत झालेले नाही. देहुरोड परिसर संवेदनशील असून, विविध जाती-धर्माचे नागरिक येथे वास्तव्यास असल्याने देहुरोडला “मिनी इंडिया’ असे संबोधले जाते.
गेल्या काही काळात सलग तीन दिवस घडणाऱ्या घटनांमध्ये भाजपाचे नगरसेवक विशाल खंडेलवाल यावर झालेला गोळीबार त्यानंतर गुन्हेगारांना अटक करण्यासाठी भाजपचे आमदार बाळा भेगडे यांना मोर्चा काढावा लागला.

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांच्या कार्यालयाशेजारी दुकानाची झालेलली तोडफोड, डॉ. आंबेडकर मार्गावर खुलेआम तलवारी नाचवत दहशत माजवत फिरणाऱ्या गुंडांच्या टोळ्या तसेच वाढती गुन्हेगारी आदी बाबी पाहता देहूरोडकर दहशतीखाली आहेत. परिसरात झोपडपट्ट्यांची संख्या अधिक असून, गांधीनगर, आंबेडकरनगर, एमबी कॅम्प, पारशी चाळ परिसरात गुंडांचा वावर नेहमीच असतो. शाळेतील विद्यार्थ्यांना ही या बाबींचा सर्रासपणे त्रास होत असतो. अशा सराईत गुन्हेगारांवर तडीपार, मोक्का, झोपडपट्टी दादा अशी ठोस कारवाई झाल्यास दहशतीला गुन्हेगारीला आळा बसू शकतो, अशी कडक कारवाई होत नसल्याने, किरकोळ कारवाईनंतर गुन्हेगार सुटल्याने पुन्हा दहशत माजवीत गुंडाचा धुमाकूळ सुरू आहे.

तसेच उड्डाणपुलाखाली तळीराम खुलेआम मद्यप्राशन करीत उभे असतात. मद्यपानानंतर बाटल्या रस्त्यावरच फोडली जातात. ये-जा करताना अश्‍लिल भाषेत शिवीगाळ करीत असतात. नेहरू मंगल कार्यालय, भाजी मंडई, वृंदावन चौक, अबुशेठ मार्ग, एम.बी. कॅम्प, मुकाई चौक, शीतळानगर, डॉ. आंबेडकर मार्ग, श्री शिवाजी विद्यालय आदी परिसरात तरुण-मुले टोळक्‍यांनी दिवस-रात्र बसलेले असतात. यामध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश मोठ्या प्रमाणात आहे.
सराईत गुन्हेगार या अल्पवयीन मुलांचा वापर करत असतो. ही मुले ये-जा करणाऱ्या पादचारी, वृद्धांचे, महिला वर्गाची छेडछाड, टिंगळटवाळी करीत असतात.

किरकोळ कारवाईनंतर ही मुले सुटत असल्याने या गुन्हेगारांचा पुन्हा त्रास होईल म्हणून नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे येत आहे. देहूरोड बाजारपेठ, विकासनगर, मुकाई चौक, रावेत, देहू आदी ठिकाणी पोलीस चौकी तयार करून सक्षम अधिकारी व पोलिसांची नियुक्‍त करण्यात यावे. प्रत्येक मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावे, कार्यक्षम गुन्हे नियंत्रक पथक, विशेष गुंडास्कॉड, प्रति अर्ध्या तासांनी पोलिसांची गस्त, पुरेसे मनुष्यबळ, गुन्हेगारांवर जरब बसेल, असे कार्यक्षम पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात यावे, अशी विविध मागणी देहुरोड विकास समितीचे सोलमनराज भंडारे, राजु मारीमुत्तू यांनी निवेदनाद्वारे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍त यांच्याकडे केली आहे. पंधरा दिवसांत ही कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

देहुरोड विभागात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कसून तपासणी केली जात आहे. याशिवाय पेट्रोलिंग करण्यात येत आहे. गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच “या’ गुन्हेगारांवर तडीपार व मोक्‍कांतर्गत कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. विभागात मनुष्यबळाची कमी असतानाही परिसरात गस्त पथक तैनात केली आहे.

– श्रीकांत मोहिते,
सहायक पोलीस आयुक्‍त, देहुरोड विभाग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)