सात्विक-अश्‍विनीची जोडी उपान्त्यपूर्व फेरीत

नानजिंग: अश्‍विनी पोनप्पा आणि सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी या भारतीय जोडीने सनसनाटी विजयाची नोंद करताना जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. विश्‍वक्रमवारीत 40 व्या क्रमांकावर असलेल्या सात्विक-अश्‍विनी जोडीने उपउपान्त्यपूर्व फेरीच्या लढतीत गोह सून हुआत आणि शेव्हॉन जेमी लाय या सातव्या मानांकित मलेशियन जोडीवर 20-22, 21-14, 21-6 असा खळबळजनक विजय मिळविताना उपान्त्यपूर्व फेरी गाठली. ही लढत तब्बल 59 मिनिटे रंगली.

सात्विक-अश्‍विनी जोडीने गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आश्‍चर्यकारक कामगिरी करताना भारताला मिश्र दुहेरीचे पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. अर्थात सात्विक-अश्‍विनी जोडीसमोर आता झेंग सिवेई आणि हुआंग याक्‍विआँग या विश्‍वक्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या आणि या स्पर्धेतील अग्रमानांकित चिनी जोडीचे कडवे आव्हान आहे. आमच्यासमोरील आव्हानाची आम्हाला पुरेपूर कल्पना असली, तरी चिनी जोडीला पराभूत करण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू. मात्र पदक जिंकण्याबद्दल सध्या तरी आम्ही विचार करीत नाही, असे अश्‍विनीने सांगितले. सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी व अश्‍विनी पोनप्पा या जोडीने त्याआधी मार्क लॅम्सफस व इसाबेल हेरट्रिच या 15व्या मानांकित जर्मन जोडीची झुंज मोडून काढताना उपउपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली होती.
दरम्यान बाकी भारतीय जोड्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. रोहन कपूर व कुहू गर्ग या जोडीला ख्रिस ऍडकॉक व गॅब्रिएली ऍडकॉक या सहाव्या मानांकित ब्रिटिश जोडीविरुद्ध पराभव पत्करावा लागला. सौरभ शर्मा व अनुष्का पारीख या जोडीलाही चॅंग पेंग सून व गोह लियू यिंग या आठव्या मानांकित मलेशियन जोडीने पराभूत केले. तसेच मिश्र दुहेरीत प्रणव चोप्रा व सिक्‍की रेड्डी या अव्वल जोडीला हफीझ फैझल व ग्लोरिया इमॅन्युएल या 12व्या मानांकित इंडोनेशियन जोडीकडून पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने किम ऍस्ट्रप आणि अँडर्स रॅस्मुसेन या आठव्या मानांकित ब्रिटिश जोडीविरुद्ध पराभव पत्करला. तर महिला दुहेरीत युकी फुकुशिमा व सायाका हिरोटा या द्वितीय मानांकित जपानी जोडीने अश्‍विनी पोनप्पा व सिक्‍की रेड्डी या भारतीय जोडीला सहज पराभूत केले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)