थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा

बॅंकॉक: भारताची ऑलिम्पिक रौप्यविजेती खेळाडू पी. व्ही. सिंधूने हॉंगकॉंगच्या बिगरमानांकित यिप पुई यिन हिच्यावर 21-16, 21-14 असा केवळ 37 मिनिटांत विजय मिळविताना थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीतील उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. पहिल्या फेरीत बल्गेरियाच्या लिंडा झेटचिरीचा एकतर्फी पराभव करणाऱ्या सिंधूसमोर आता मलेशियाच्या सोनिया चीह हिचे आव्हान आहे. सोनियाने चीनच्या झांग यिमानचा 21-17, 21-17 असा पराभव केला.

मात्र चतुर्थ मानांकित एच. एस. प्रणय व पारुपल्ली कश्‍यप यांचे पुरुष एकेरीतील आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. तसेच मिश्र दुहेरी व पुरुष दुहेरीतही भारतीय जोड्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्याआधी आठवा मानांकित समीर वर्मा आणि युवा महिला खेळाडू वैष्णवी रेड्डी यांना पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता.

पुरुष एकेरीत चतुर्थ मानांकित प्रणयने स्पेनच्या पाब्लो ऍबियनला पराभूत करीत विजयी सलामी दिली होती. परंतु दुसऱ्या फेरीत प्रणयला इंडोनेशियाच्या सोनी द्वि कुंकोरोविरुद्ध 18-21, 14-21 असा 35 मिनिटांत पराभव पत्करावा लागला. तसेच पहिल्या फेरीत कॅनडाच्या जेसन अँथनीला नमविणाऱ्या कश्‍यपला दुसऱ्या फेरीच्या लढतीत जपानच्या कॅन्टा सुनेयामाविरुद्ध 18-21, 21-18, 19-21 असा कडव्या झुंजीनंतर पराभव पत्करावा लागला. ही लढत 68 मिनिटांपेक्षाही अधिक काळ रंगली.

मिश्र दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा व सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी या जोडीला युकी कानेको व मायुकी मात्सुमोटो या जपानी जोडीने 21-11, 21-16 असे 28 मिनिटांत पराभूत केले. तर पुरुष दुहेरीत मनू अत्री व सुमीत रेड्डी या भारतीय जोडीला एक तासाहून अधिक काळ रंगलेल्या लढतीत हिरोयुकी एन्डो व युता वातानाबे या जपानी जोडीकडून 24-22, 13-21, 19-21 अशा पराभवाला सामोरे जावे लागले.

त्याआधी पुरुष एकेरीत भारताच्या राष्ट्रीय विजेत्या समीर वर्माला थायलंडच्या बिगरमानांकित तानोंगसाक सेनसोम्बुन्सुककडून, तसेच महिला एकेरीत भारताच्या वैष्णवी रेड्डीला जपानच्या आठव्या मानांकित सायाका सातोकडून पराभव पत्करावा लागला होता. तसेच मिश्र दुहेरीत सौरभ शर्मा व अनुष्का पारीख या जोडीचे आव्हान सलामीलाच संपुष्टात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)