‘आरटीई’च्या दुसऱ्या फेरीला मुहूर्त मिळेना.

विद्यार्थ्यांचे प्रवेश खोळंबले

शासनाने जाहीर केलेल्या आरटीईच्या वेळापत्रकाप्रमाणे आरटीई प्रवेशासाठी 8 ते 22 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी केलेल्या शाळांची पडताळणी होऊन 25 फेब्रुवारी ते 11 मार्चपर्यंत पालकांना अर्ज भरता येणार होते. मात्र, वेळापत्रकाप्रमाणे सर्व प्रक्रियेला उशीर झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील 172 शाळांतील साडेतीन हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश खोळंबले.

पिंपरी – मोफत शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) पहिली फेरी संपून महिना उलटत आला आहे. सद्यस्थितीत दुसरी फेरी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापपर्यत दुसरी फेरी सुरुच न झाल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. यामुळे, प्रवेश प्रक्रिया रखडणार का? असा प्रश्‍न पालक उपस्थित करत आहेत.

आरटीई परिक्षेची पहिली फेरी संपून मे महिना उलटला तरी दुसऱ्या फेरीची तारीख अजून निश्‍चित करण्यात आली नाही. त्यामुळे, आरटीई प्रवेशाचे पूर्ण वेळापत्रक कोलमडले आहे. दरवर्षी प्रवेशाच्या सुरूवातीला आरटीईचे वेळापत्रक जाहीर केले जाते. मात्र, या वेळापत्रकानुसार दरवर्षी प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना बसतो. यंदा मे महिना संपत आला असूनही दुसरी फेरी सुरू झाली नसल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार की नाही असा प्रश्‍न पालक विचारत आहेत.

राज्यभरात आरटीईच्या शाळा नोंदणीस 8 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. 22 मार्चपासून पालकांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरायचे होते. त्यानंतर 11 ते 26 एप्रिल दरम्यान कागदपत्रे पडताळणी केली जाणार होती. मात्र, पडताळणी वेळेत पूर्ण झाली नसल्यामुळे दोनदा मुदतवाढ देण्यात आल्याने मे महिना पहिल्या फेरीतच संपत आला आहे. शाळा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी राहिले असूनही प्रवेश प्रक्रियेचा खोळंबा झाल्याने आरटीई अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणारे पालक हवालदिल झाले आहेत. आरटीईचे प्रवेश घेताना ऑनलाईन अर्ज भरण्यापासून गोंधळ सुरु आहे. कागदपत्रांची पडताळणी करतानाही अनेक पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मे महिना संपत असूनही प्रवेशाची दुसरी फेरी सुरु न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे, मत पालकांनी व्यक्‍त केले.

सद्यस्थितीत पहिल्या फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असून बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तसेच, आरटीई प्रवेशासंदर्भात शिक्षण संचालनालयाने आदेश काढल्यानंतर दुसरी फेरी सुरु होणार आहे.

– ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी, महापालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)