राज्यसभेत बहुमतासाठी भाजपची विरोधकांना प्रलोभन

नवी दिल्ली- राज्यसभेमध्ये बहुमतासाठी भाजपकडून गेल्या काही आठवड्यांपासून विरोधी पक्षांना प्रलोभन दाखवून आपले संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. राज्यसभेतील तेलगू देसमचे सहा खासदार अलिकडेच भाजपमध्ये सामील झाले. समाजवादी पार्टीचे नीरज शेखर हे देखील राजीनामा देऊन भाजपमध्ये सामील झाले. रज्य विधानसभेमध्ये बहुमत असल्यामुळे या रिक्‍त जागा भरणे भाजपला सहज शक्‍य आहे. नीरज शेखर हे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे चिरंजीव आहेत. समाजवादी पार्टीतील नेत्यांमध्ये पार्टी अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाविषयी नाराजी असल्यामुळे समाजवादी पार्टीचे आणखी नेतेही भाजपमध्ये सामील होतील असा अंदाज शेखर यांनी वर्तवला आहे.

जर भाजपचे वरिष्ठ नेते या असंतुष्टांशी बोलले तर यापैकी काही खासदार निश्‍चितच भाजपमध्ये येतील, असे शेखर म्हणाले. समाजवादी पार्टी सोडून भाजपमध्ये येण्यास आपल्याला जसा अनुभव कारणीभूत ठरला, तसा इतरही नेत्यांना आला असेल. मात्र त्यामुळे भाजपचे संख्याबळ खूप वाढणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणताही पर्याय नाही, हे लोकसभेच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे, असेही शेखर म्हणाले.

245 सदस्यांच्या राज्यसभेत भाजपचे संख्याबळ 75 झाले आहे. पुढील वर्षी सत्तारुढ “एनडीए’ला राज्यसभेमध्ये स्वतःच्या बळावर बहुमत मिळण्याची शक्‍यता आहे. मात्र त्यापूर्वीच निम्म्यापेक्षा अधिक सदस्यांचे पाठबळ भाजपला मिळण्याची शक्‍यता आता निर्माण झाली आहे. कुंपणावर बसलेल्या बिजेडी, वायएसआर, सीपी आणि टीएसआर सारख्या पक्षांचे सहकार्य मिळाले तर भाजपचे संख्याबळ वाढेल. मात्र तरीही “एनडीए’ राज्यसभेत बहुमतात येऊ शकणार नाही, असे सूत्रांनी म्हटले आहे.

जेडियु सारख्या भाजपच्या मित्र पक्षांनी तिहेरी तलाक आणि नागरिकत्व दुरुस्ती विधेयकासारख्या मुद्दयावर भाजपला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे राज्यसभेत संख्याबळ वाढवण्यासाठी भाजपचा आटापिटा चालला आहे. पंतप्रधानांसारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी ओडिशचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनईक यांना राज्यसभेतील तीनपैकी एक जागा देऊ केली आहे. पण सत्ताधारी पक्षाच्या अजेंड्यापासून दूर असलेल्या अशा पक्षांकडून संख्याबळ वाढवण्यापेक्षा विरोधकांची संख्या कमी केली जाऊ शकेल. भाजपच्या “एनडीए’चे सदस्य नसलेल्या वायएसआर कॉंग्रेससारख्या काही पक्षांकडून मुद्दयांवर आधारलेला पाठिंबा मिळवला जाऊ शकतो, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

तेलगू देसम आणि सपाच्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. राज्यसभेत त्यांच्या जागेवर हे पक्ष आपले उमेदवार निवडून आणू शकत नाहीत. चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसमचा आंध्र विधानसभेच्या निवडणूकीत वायएसआर कॉंग्रेसकडून दारुण पराभव झाला आहे. तर उत्तर प्रदेशात 404 सदस्यांच्या विधानसभेत भाजपच्या 300 जागा आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)