मुंबई – कर्नाटकातील राजकीय नाट्याला रोज एक नवी कलाटणी मिळत असून यामध्ये आज कर्नाटक काँग्रेसचे जेष्ठ नेते डी के शिवकुमार यांच्या अटकेची भर पडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये मुक्कामास असलेल्या काँग्रेस-जेडीएस आमदारांची भेट घेण्यासाठी आज डी के शिवकुमार हे मुंबईमध्ये दाखल झाले होते. मात्र डी के शिवकुमार बंडखोर आमदार वास्तव्यास असलेल्या हॉटेलच्या आवारात दाखल होताच त्यांना मुंबईतील बेकेसी पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, डी के शिवकुमार मुंबई येथे आल्याने त्यांच्या भेटीला आलेले मुंबई काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा व नसीम खान यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून या तीनही नेत्यांना बीकेसी पोलिसांच्या विश्रामगृहामध्ये नेण्यात आले आहे.
तत्पूर्वी, आज सकाळी ८.२० मिनिटांनी शिवकुमार हे बंडखोर आमदार मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये दाखल झाले होते. त्यांनी सदर हॉटेलमध्ये आपल्यासाठी खोली देखील आरक्षित केली होती. मात्र मुंबई पोलिसांनी या हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या आमदारांनी मुंबई पोलीस प्रमुखांना शिवकुमार यांच्यापासून आमच्या जीवाला धोका असल्याचे पत्र लिहिले असल्याने त्यांना (शिवकुमार यांना) येथे थांबता येणार नाही अशी भूमिका घेतली. परंतु शिवकुमार यांनी आपण आमदारांची भेट घेतल्याशिवाय येथून हलणार नाही असा पवित्र घेतल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.