पवन मावळात चारसूत्री भात लागवडीस सुरुवात

मावळ तालुक्‍यात लागवडीसाठी भडवली गाव आघाडीवर

पवनानगर – पवन मावळात भात लागवड करण्यास सुरुवात झाली असून मावळ तालुक्‍यातील भडवली गावात मावळ कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार प्रथमच चारसूत्री लागवड करण्यात आली आहे.

मावळ तालुक्‍यात इतर भागात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, भडवलीच्या शेतकऱ्यांनी उपलब्ध शेतीपंपाच्या पाण्यावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड सुरू केली आहे. भडवली येथील प्रगतशील शेतकरी रघुनाथ सखाराम लोहर यांच्या शेतात सहाय्यक कृषि अधिकारी दत्तात्रय गावडे यांच्या मार्गदर्शना खाली दोन एकर क्षेत्रावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली. यावेळी दत्तात्रय गावडे, दत्ता घोगरे, खंडागळे आदी उपस्थित होते.

भडवली येथे पाण्याची सोय असल्यामुळे रघुनाथ लोहर यांचा मुलगा प्रदीप लोहर यांनी रोपे लागवडी योग्य होताच चारसूत्री पद्धतीने भात लागवडीस सुरूवात केली. चारसुत्री पद्धतीने भाताच्या उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे गावातील इतर भीमराव घारे, प्रवीण लोहर, संभाजी लोहर, संतोष राऊत, नवनाथ आडकर हे शेतकरी देखील यावर्षी चारसुत्री पद्धतीने भात लागवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रदीप लोहर म्हणाले की, चारसूत्री पद्धतित भात रोपे कमी लागत असून भात लावणीस कमी वेळ लागतो व बियाने कमी लागल्यामुळे बियाने खर्च ही कमी येतो युरिया ब्रिकेट खोल खोचल्यामुळे जामिनीच्या पृष्ठ भागाच्या वरील तनाचा प्रादुर्भाव कमी होतो. खर्चामध्ये 30 टक्के बचत होते. किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच भाताच्या उत्पादनात 3 ते 4 पट वाढ होते, अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.

भडवली या गावामध्ये यापूर्वी चारसुत्री पद्धतीने भात लागवड होत नव्हती. कृषि विभागाच्या मार्गदर्शनाने व प्रयत्नाने शेतीशाळेच्या माध्यमातून या वर्षी किमान 15 ते 20 हेक्‍टर क्षेत्रावर चारसूत्री पद्धतीने भात लागवडीचे नियोजन केले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चारसूत्री पद्धतीने भात लागवड करावी.

– दत्तात्रय गावडे, सहाय्यक कृषी अधिकारी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here