ऑनलाइन बाजारात गोवऱ्या, लाकडांची ‘आग’

होळीच्या पार्श्‍वभूमीवर वस्तू घरपोच पाठविण्याची कंपन्यांची शक्‍कल

पुणे – “इंटरनेट’च्या युगात कपडे, ऍक्‍सेसरिज, पुस्तके, इलेक्‍ट्रिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंपासून ते जीवनावश्‍यक वस्तू, गाड्या एक ना अनेक वस्तू सर्रास “ऑनलाइन ऑर्डर’ केल्या की काही तासांत आपल्या पुढ्यात घरपोच हजर केल्या जातात. या “ऑनलाइन’च्या जमान्यात आता चक्क होळीसाठी लागणाऱ्या “शेणाच्या गोवऱ्या’ आणि “लाकडे’ही उपलब्ध झाली आहेत. तुम्ही ऑर्डर करा, काही तासांतच होळीसाठी लागणाऱ्या वस्तू तुमच्या दारात तुम्हांला मिळू शकणार आहेत.

अनेक जीवनावश्‍यक वस्तूंबरोबर या वस्तू पुरवठा करणाऱ्या ऑनलाइन साईट्‌सनी आता लोकांच्या धार्मिक भावनेलाही हात घालून त्यात शिरकाव केला आहे. अगदी सत्यनारायणापासून ते गणपतीची प्रतिष्ठापना करेपर्यंत सर्व सणांसाठी, पूजेसाठी लागणारे साहित्यही हल्ली ऑनलाइन मागवता येते. त्यात आता होळीला लागणारी लाकडे आणि गोवऱ्यांचा समावेश झाला आहे.

नेहमी “ऑनलाईन शॉपिंग साईटस’ वर वेगवेगळ्या “ऑफर्स’ पाहायला मिळतात. पण होळीचे औचित्य साधून “गोवऱ्या’ आणि “लाकडां’वरही “ऑफर’ देण्याची शक्कल या ऑनलाइन कंपन्यांनी लढवली आहे. एकतर याही वस्तू ऑनलाइन मिळायला लागल्यामुळे जनमानसात आश्‍चर्याची भावना निर्माण झाली आहेच, परंतु या “ऑफर’च्या लढवलेल्या शक्कलीमुळे आश्‍चर्यही व्यक्त केले जात आहे.

विविध “पॅकेज’मध्ये ऑनलाइन उपलब्ध होणाऱ्या गोवऱ्यांसाठी अगदी 50 ते 300 रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागणार आहे. तर “केवळ’ 10 लाकडांची विक्री तब्बल 300 रुपयांपासून होत आहे. नेहमी ग्रामीण भागांमधून शहरी भागांमध्ये “गोवऱ्या’ आणि “लाकडे’ विकायला येणारे व्यापारी दिसतात. मात्र आता “हे’ साहित्य “ऑनलाइन’ उपलब्ध झाल्याने याचाही “सिझनल ट्रेंड’ सुरू होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

लाकडे विक्रीच्या परवानगीबाबत प्रश्‍नचिन्ह
लाकूड तोडण्यावर अतिशय कडक निर्बंध आहेत. एक झाड तोडल्यास थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. अशा परिस्थितीत “ऑनलाइन साईट्‌स’वर अशा गोष्टी उपलब्ध झाल्याने त्या विक्रीच्या परवानगीबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)