चंदीगड – देशभरामध्ये सध्या लोकसभा निवडणुका रंगात आल्या असून आतापर्यंत लोकसभा निवडणुकांचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. येत्या सोमवारी लोकसभा निवडणुकांचा चौथा टप्पा देशभरामध्ये पार पडणार असून यासाठी विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये हिरीरीने सहभाग घेत आहेत. दरम्यान, हरियाणामधील लोकसभेच्या सर्वच्या सर्व १० जागांवर सहाव्या टप्प्यामध्ये निवडणुका घेण्यात येणार असून हरियाणामध्ये १२ मे रोजी प्रत्यक्ष मतदान होईल.
हरियाणामध्ये मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेमध्ये असून यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणामध्ये भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष व जननायक जनता दलाच्या आघाडीमध्ये तिहेरी लढत होणार आहे.
याच पार्श्ववभूमीवर हरियाणामध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला असून यंदाच्या निवडणुकांचे वैशिष्ट म्हणजे यावेळी हरियाणातील ४ महिला आमदार आपल्या मुलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. कॉंग्रेस नेत्या किरण चौधरी व रेणुका बिश्नोई, भाजप नेत्या प्रेम लता आणि जनायक जनता पार्टीच्या (जेजेपी) नेत्या नैना चौटाला ही या महिला आमदारांची नावे असून सध्या त्या आपल्या मुलांसाठी प्रचार करण्यामध्ये व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
कॉंग्रेस नेत्या किरण चौधरी यांच्या कन्या श्रुति चौधरी भिवानी-महेन्द्रगढ येथून निवडणूक लढवत आहेत तर रेणुका बिश्नोई यांचे पुत्र भव्य बिश्नोई, प्रेम लता यांचे पुत्र ब्रजेंद्र आणि नैना चौटाला यांचे पुत्र व हिसारचे विद्यमान खासदार दुष्यंत चौटाला यांच्यामध्ये हिसार लोकसभा मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होणार आहे.