विधिमंडळात हक्‍कभंग आणणार 

राधाकृष्ण विखे-पाटील : मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल फुटला कसा?

मुंबई – मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अद्याप सार्वजनिक झालेला नाही.त्यातील शिफारशींची अधिकृत माहिती नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याआधारे कशी काय घोषणा करू शकतात? आयोगाचे सदस्य प्रसारमाध्यमांसमोर जाउन कसे काय बोलू शकतात? असे संतप्त सवाल करताना याविरोधात आपण विधिमंडळात हक्‍कभंग प्रस्ताव आणणार असल्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.

आझाद मैदानावर मागील दोन आठवड्यांपासून उपोषणावर असलेले मराठा क्रांतिमोर्चाचे प्रा. संभाजी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचीराधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. विखे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अजून विधिमंडळाच्या पटलावर सादर झालेला नाही. तो अहवाल सरकारने स्वीकारलेला नाही. त्यात नेमक्‍या काय शिफारसी आहेत, ते अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही.

या परिस्थितीत मराठा समाजाने 1 डिसेंबरला जल्लोष करावा, असे मुख्यमंत्री कशाच्या आधारावर सांगतात? आयोगाचे सदस्य प्रसारमाध्यमांना मुलाखती कसे देत सुटतात?या अहवालाबाबत आज संपूर्ण राज्यात संदिग्धता निर्माण झाली आहे. प्रसारमाध्यमातून सूत्रांच्या आधारे समोर आलेल्या अस्पष्ट निष्कर्षांमुळे मराठा व इतर मागासवर्गीय समाजात तणावाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. ही परिस्थिती पाहता सरकारला राज्यात दंगली घडवायच्या आहेत की काय? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

आझाद मैदानावर आंदोलन करणारे प्रा. संभाजी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या मागण्या व प्रकृतीची माहिती घेतली. राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगताच विखे पाटील यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ मंत्र्यांना आंदोलनस्थळी पाठवत असल्याचे आश्वासन दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)