दोन वर्षांत दिड लाख पदे भरणार

मुख्यमंत्र्यांची घोषणा : पायाभूत, सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्रात आघाडीवर

मुंबई – राज्य सरकारी सेवेतील दिड लाख पदे रिक्त असून ही सर्व पदे येत्या दोन वर्षांत भरणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधानसभेत केली. राज्य सरकारने जाहिर केल्यानुसार विविध विभागांतील 72 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली.

गेले दोन दिवस विधानसभेत सुरु असलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिले. आपल्या उत्तरात विरोधी पक्षाची टिका खोडून काढताना फडणवीस यांनी गेल्या 5 वर्षांतील सरकारच्या कामगिरीचा आलेख मांडला. जलयुक्त शिवार योजनेत घोटाळे झाल्याच्या आरोपाचा इन्कार करताना फडणवीस यांनी या योजनेमुळे पावसावरचे अवलंबित्व कमी होऊन संरक्षीत सिंचन व्यवस्था उभी करण्यात यश आल्याचा दावा केला.

पाणी साठवण्याची व्यवस्था म्हणून 1 लाख 61 हजार शेततळी निर्माण झाली आहेत. आता शेततळ्यांसाठी रोजगार हमी योजनेतून 45 हजार रुपये आणि राज्य सरकारकडून 50 हजार रुपये असे एकूण 95 हजार रुपये देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहिर केले.

राज्यभरात रस्त्यांचे जाळे विणले जात आहेत. गेल्या 3 वर्षात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत 30 हजार किमी लांबीचे रस्ते निर्माण झाले आहेत. त्याशिवाय 17 हजार 500 किमीचे राष्ट्रीय महामार्ग आणि हायब्रीड ऍन्युयिटीतून 10 किमी लांबीचे रस्ते तयार होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई-गोवा महामार्गाचे 378 किमी लांबीच्या रस्त्याचे काम डिसेंबर 2020 पर्यंत पुर्ण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यपालांनी ठरवून दिलेल्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे. सरकार प्रत्येक घटकासाठी काम करीत असून महाराष्ट्राला पहिल्या क्रमाकांचे राज्य बनवने हेच आमचे ध्येय असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

आंबेडकर स्मारकाचे 2020 पर्यंत पूर्ण

मुंबईजवळ उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी सर्व परवानग्या घेतल्या आहेत. स्मारकाच्या पूर्वतयारीवर 70 ते 80 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. स्मारकाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी ऍटर्नी जनरलला विनंती करण्यात आली आहे. इंदू मिलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरू असून पूतळ्याची उंची 350 फूटावरून 450 फूट करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2020 साली महापरिनिर्वाणदिनी जनतेला स्मारकाचे दर्शन घेता आले पाहिजे, यापद्धतीने काम सुरु असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)