गुंतवणूकदार झाले 8.83 लाख कोटींनी श्रीमंत

-सरलेल्या आर्थिक वर्षात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक वाढला 17.30 टक्‍क्‍यांनी

-आगामी वर्षाबाबतही शेअर गुंतवणूकदार आशावादी

मुंबई -2018-19 या आर्थिक वर्षात शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या कालावधीत गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य 8.83 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. या वर्षात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 5704 अंकांनी म्हणजे 17.30 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. 29 ऑगस्ट रोजी सेन्सेक्‍स 38989 या विक्रमी पातळीवर गेला होता.

आता निवडणुकांची घोषणा झाल्यापासून शेअर बाजाराचे निर्देशांक व वेगाने वाढत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मूल्यात मोठी वाढ झाली आहे . रिझर्व बॅंकेने या अगोदर दोन वेळा व्याजदरात कपात केली आहे. त्याचबरोबर पुढील आठवड्यात आणखी कपात केली जाण्याची शक्‍यता आहे. महागाई नियंत्रणात असल्यामुळे पुढील दीर्घ काळ व्याजदर कमी पातळवीर राहण्याची शक्‍यता आहे.

त्यामुळे गुंतवणूकदार गेल्या एक महिन्यापासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत. या आर्थिक वर्षात मुंबई शेअर बाजारावर नोंदलेल्या सर्व कंपन्यांचे भांडवली मूल्य 8,83,714 कोटी रुपयांनी वाढून आता 1,51,08,711 कोटी रुपयांवर गेले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मूल्यात वाढ झाली आहे.

2017-18 या आर्थिक वर्षात शेअर बाजारावर नोंदलेल्या सर्व कंपन्यांचे एकत्रित भांडवली मूल्य 20.70 लाख कोटी रुपयांनी वाढले होते. 2019 च्या सुरुवातीला शेअर बाजारात थोडीशी मंदी होती. भारत-पाकिस्तान तनाव, जागतिक बाजारातील मंदी, वाढणारे क्रूड तेलाचे भाव या कारणामुळे शेअर बाजारात मंदी होती. मात्र, नंतर सर्व परिस्थिती वेगाने बदलत आहे. अमेरिकेतही मंदीमुळे व्याजदर कमी प्रमाणात वाढणार आहेत.

त्यामुळे जागतिक बाजारात भांडवल सुलभता निर्माण झाली आहे. परिणामी भारतात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याचे चित्र बाजारात निर्माण झाले आहे. यासंबंधी बोलताना जीओजी या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, आता गुंतवणूकदारांचे लक्ष लोकसभा निवडणुकाकडे आहे. त्याचबरोबर लवकरच कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम आगामी काळात निर्देशांकावर कमी-अधिक प्रमाणात होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)